बेळगाव रोटरी क्लबच्या प्लॅटिनम ज्युबिलीच्या निमित्ताने प्रथमच ‘आय’ स्टोअरेज (नेत्र) बँक सुरू होत असून अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याच्या उद्देशाने क्लबचा हा उपक्रम असल्याचे ज्येष्ठ रो. अविनाश पोतदार व संजय कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
बेळगाव रोटरी क्लब आणि युएसए रोटरी क्लबने आय स्टोअरेज बँक अनगोळ क्रॉसनजिक असलेल्या नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला ६२ हजार यूएस डॉलर म्हणजे ४२ लाख रुपयांची मदत देऊ केल्याने या नव्या नेत्रपेढीचे उद्घाटन आज शनिवार २७ रोजी होत असल्याचे ते म्हणाले.
बेळगावसह उत्तर कर्नाटक, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र आदी ठिकाणी रोटरी क्लब नेत्र बँक सुरू केली आहे. बेळगावमध्ये कॉर्नियल डोळा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया महिन्यातून दोन किंवा चार केल्या जातात, असे संजय कुलकर्णी म्हणाले.
बेंगळूर येथील नारायण नेत्रालय ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे डॉ. भुजंग शेट्टी सकाळी ११.३० वा. नेत्रपेढीचे उद्घाटन करतील, असे नेत्र रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. सचिन माउली यांनी सांगितले. क्लबचे अध्यक्ष मुकुंद उडचणकर, प्रदीप कुलकर्णी, नेत्रतज्ज्ञ डॉ. टोपरानी आदी उपस्थित होते.