मागील महिन्यात कडोली येथे घालण्यात आलेल्या मास्टरप्लॅन च्या घाटाचा फटका नागरिकांना चांगलाच बसलाय. त्यामुळे अनेकांच्या घरावर कुऱ्हाड आणून बेघर करण्याचा प्रकार घातला गेला आहे. हा प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा कडोली येथील आमराईत मिनी स्टेडियम बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे येथील नागरिकांना खेळण्यासाठी इतरत्र जावे लागणार आहे. अशा प्रकारामुळे सध्या गावचे वातावरण ढवळून निघाले असून हा प्रकार रोखण्यासाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
कडोली ग्रामपंचायत हद्दीत असणारी जमीन अनेक संस्थांना देऊन खेळाडू आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा प्रकार निंदनीय ठरला आहे. कडोली येथे असलेल्या मैदानात काहींच्या टक्केवारी मुळे मिनी स्टेडियम बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. आपल्या टक्केवारीसाठी अनेकांना बेघर करणारे आता विद्यार्थी स्पर्धक आणि इतरांना रस्त्यावर आणण्याचे काम करू लागले आहेत.
कडोली येथे सुमारे 34 एकर जमीन आहे. त्यामध्ये बीएसएनएल, पशुवैद्यकीय खाते शिक्षण संस्था आणि वैद्य खाते यांना सुमारे 26 एकर जमीन देण्यात आली आहे. सध्या ग्रामपंचायतीकडे केवळ अकरा एकर जमीन शिल्लक राहिली आहे त्यामध्ये आंबा काजू आणि इतर प्रकारची झाडे आहेत. याच अकरा एकर जमिनीत काही भागात क्रिकेट, धावणे, उंच उडी, लांब उडी, खोखो यासाठी मैदान तयार करण्यात आली आहेत. मात्र याठिकाणी जर मिनी स्टेडियम झाले तर गावातील खेळाडूंचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.
नुकतेच कडोली ग्रामपंचायत हद्दीत मास्टर प्लॅन होण्याची गरज नसताना देखील अनेकांच्या स्वप्नांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ही घटना ताजी असताना देखील आता नवीन कपटी डाव काही नेत्यांनी आपल्या टक्केवारीसाठी घातला आहे. जर कडोली येथे मिनी स्टेडियम झाले तर गावातील मुले खेळणार कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या असलेल्या मैदानात मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. याचबरोबर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या कार्यक्षेत्रात संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. मिनी स्टेडियम साठी काहीतरी खोदण्यात आले आहेत, त्यामुळे या स्टेडियमचे काम सुरू झाले आहे की काय हा प्रश्न असतानाच कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू आहे. याचा विचार गांभीर्याने करून ग्रामस्थ आणि खेळाडूंनी हा प्रकार हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.