काँग्रेसचे आमदार असले तरी वेगवेगळ्या कारणांनी नाराज झालेले आणि काँग्रेसच्या निवडणूक कामकाजापासून दूर झालेले रमेश जारकीहोळी यांच्या नॉन कनेक्टिव्हिटी मुळे आता वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी निवडणुकीच्या काळात गोकाक चा कार्यभार आपले भाऊ लखन यांच्याकडे सोपवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रमेश यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते संपर्कात येत नाहीत यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचे काम लखन सांभाळतील अशी माहिती सतीश यांनी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर दिली आहे .
लखन यांना प्रचाराचे काम सोपवण्यात आले आहे, खरे तर ही जबाबदारी त्या भागातील आमदार म्हणून रमेश जारकीहोळी यांच्यावर होती मात्र काही कारणांमुळे नाराज झालेल्या रमेश यांनी पक्षाच्या बैठका व इतर सर्व गोष्टींना हरताळ फासून पक्षापासून विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे या परिस्थितीत सतीश जारकीहोळी हे इतर सर्वच मतदारसंघात सक्रिय काम करत असल्यामुळे गोकाक ची जबाबदारी आता लखन यांच्याकडे राहील असे त्यांनी सांगितले.
सतीश जारकीहोळी यांनी दिलेली जबाबदारी त्यांचेच भाऊ असलेले लखन कितपत निभावून नेतात हे आता लोकसभा बेळगाव मतदारसंघातून पडणाऱ्या मतांवरून ठरणार आहे. याचबरोबर रमेश यांना मानणारी मते कोणत्या पक्षाला जाणार यावरही बरेच काही अवलंबून आहे.