सध्या दुष्काळाच्या झळा तीव्र होत असतानाच दुसरीकडे धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाल्यानंतर आता पाण्याची टंचाई तीव्र बसू लागली आहे. एकीकडे पाणी समस्या गंभीर होत असताना दुसरीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून हिडकल डॅम कडे पाहिले जाते. मात्र त्या धरणातील आता पाणीसाठा कमी होत असल्याने अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असताना सध्या अधिकारी मात्र निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत.
जलसंवर्धन आणि पाणी पुरवठा विभाग याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात ही समस्या गंभीर बनत जाणार आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडला तरी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेष करून उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.
प्रशासनाने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले हात वर करून अनेकांना भटकंती करण्यास भाग पाडले आहे. धरणातील पाणी कमी झाल्याने शेतीसह पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जर येत्या काही दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर ही समस्या गंभीर बनणार आहे. उपलब्ध असणारा पाणीसाठा मे महिन्यापर्यंत पुरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यापुढे जर पाऊस झाला नाही तर अनेकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. सध्या ही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कोणतेच पाऊल उचलत नाही . त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे