आठ दिवसापूर्वी वळीवाने शहर आणि परिसरात चांगलीच हजेरी लावली. यामुळे उष्म्यात होरपळणाऱ्या काहींना दिलासा मिळाला तर शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त झाले. मात्र आता पुन्हा उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न झाल्यास त्याचा कहर साऱ्यांनाच असहाय्य ठरणार आहे. त्यामुळे सध्या पावसाची नितांत गरज आहे.
मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. मागील आठ दिवसापूर्वी दोन वेळा पावसाने शहर आणि परिसरात चांगली हजेरी लावली. यामुळे अनेकातून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र आठ दिवसापासून आता पुन्हा पावसाने दांडी मारली असून उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बेळगाव शहराचा पारा सध्या 40 अंशावर जाऊन पोहोचला आहे तर किमान तापमान 25 वर गेले आहे. त्यामुळे जर पाऊस न झाल्यास यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील चार दिवसांपासून बेळगाव परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार व रविवारी तर पाऊस येणार अशी शक्यता होती मात्र पावसाने अचानक दांडी मारल्याने नागरिकांची घालमेल पुन्हा वाढू लागली आहे. चार ते पाच दिवसात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे मात्र जर पाऊस न झाल्यास पाण्याचा प्रश्न आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे ,त्यामुळे लवकरात लवकर पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
(फोटो:निवडणुकीच्या बंदोबस्तास असलेले पोलीस वाढत्या गर्मीत असे नारळ पाणी सेवन करताना दिसत आहेत)
जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर अनेकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीत प्रशासन गुंतले असले तरी नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने निवडणुकीबरोबरच नागरिकांच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही निकालात काढणे गरजेचे ठरणार आहे. वारंवार यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आणखी जोरदार पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. शेतातील मशागती बरोबरच इतर कामेही करण्यास शेतकरी कामात गुंतले जाणार आहेत. त्यामुळे सध्या जोरदार पावसाची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.