अंमली पदार्थाची तस्करीमुळे जागतिक पातळीवर बदनाम झालेल्या बेळगाव शहरात आता अवैद्य शस्त्रांची तस्करी वाढली आहे. विजापुर, मुंबई व कारवार येथून अत्यंत सहजपणे भरकटलेल्या तरुणांच्या हाती गावठी पिस्तूल, रिव्हॉल्वर उपलब्ध होऊ लागली आहे आणि अलीकडच्या काळात वाढलेली गुन्हेगारी विनापरवाना अवैध शस्त्रांचा वापर यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून पोलिसच कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव शहर हे दुसरी मुंबई म्हणून ओळखले जाते. येथे अनेक अवैध धंदे, अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी वाढल्यामुळे गुंडागिरी ही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. याचा विचार करून यापुढे तरी अवैध शस्त्रांची तस्करी थांबवण्यासाठी कोण प्रयत्न करणार असा सवाल उपस्थित होत आहे.
बेळगावात शस्त्रांचा वापर काही नवा नाही. मागील काही वर्षापासून स्थानिक पातळीवरही गावठी पिस्तूल बनवली जात आहेत. बेळगाव तालुक्यातील बैलहोगल तालुक्यातील काही गावांमध्ये आजही गावठी पिस्तूल व इतर सामग्रीचा वापर करून शस्त्रास्त्रांचा वापर वाढविण्यात येत आहे. बारा वर्षांपूर्वी बैलहोंगल तालुक्यात पिस्तुलांची अधिक निर्मिती करण्यात आली होती. त्याचबरोबर बिहार उत्तर प्रदेश मधुनही शस्त्रास्त्रांची आवक बेळगाव मध्ये नियमित सुरू असते.
मुंबई अंडरवर्ल्डमधील काही टोळी प्रमुखांनी बेळगाव येथे आश्रय घेतल्यानंतर अवैद्य शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या धंद्यात अनेक बड्या गुन्हेगारांचा सहभाग वाढत आहे. पोलीस मुख्यालयातील शस्त्रगारातील शास्त्रेही अवैध मार्गाने विक्री झाली आहेत. त्यामुळे बेळगावात शस्त्रांचा वापर थांबवण्यासाठी पोलीस कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे
बेळगाव जिल्ह्यात 13 हजार हुन अधीक परवानाधारक शस्त्र आहेत. यामध्ये सिंगल बॅरेल डबल बॅरल बंदूकची संख्या अधिक आहे. शहरी भागातील उद्योजक रिअल इस्टेट व्यवसायिक आदींनी स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूल रिव्हॉल्वरचा परवाना मिळविला आहे. तर ग्रामीण भागातील परवानाधारक पीक संरक्षणासाठी म्हणून शस्त्रे बाळगण्याचा परवाना घेतला आहे. मात्र अवैधरित्या शस्त्र बाळगणारे यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पोलिस दलासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे.