बेळगाव येथील प्रकाश चित्रपटगृहात पद्मावत चित्रपट दाखविला जात असताना झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्या प्रकरणी चौकशी व न्यायालयीन प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींना बेळगाव न्यायालयात हजर करण्यात आले.यापूर्वी अटकेत असलेल्या भरत कुरणे यालाही बेळगाव न्यायालयात हजर करून चौकशी करण्यात आली आहे.
पद्मावत चित्रपट चालू असताना अचानक पेट्रोल भरलेल्या फुग्यांचा बॉम्ब बेळगावच्या प्रकाश थिएटर वर टाकण्यात आला.
कोणतीच आग किंवा धमाका होऊ शकला नाही, रात्री ९.३० वाजता हा प्रकार झाला होता, प्रत्यक्षदर्शींनी दोन मोठे धमक्याचे आवाज आले असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला होता. सुदैवानेच या घटनेत कुणालाही इजा झाली नव्हती.
प्रकाशसह पद्मावत रिलीज झालेल्या इतर सिनेमागृहात देखील या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
याप्रकरणी एक तरुणास पोलिसांनी अटक केली होती.
संभाजी मारुती पाटील (वय २८) रा.हलकर्णी( ता.खानापूर) असे त्याचे नाव आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास करता संभाजी हाती लागला.
बेळगावात करणी सेना नाही, मग हा प्रकार कुणी केला या दिशेने तपास सुरू असताना संभाजी हा श्रीराम सेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
रॉकेल बॉम्ब टाकून दहशत माजवल्याचा गुन्हा त्याच्यावर खडेबाजार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे, मात्र या हल्ल्यावेळी संभाजी हा आपल्या गावी होता आणि त्याचा या हल्ल्याशी काहीच संबंध नसून त्याला अकारण गोवण्यात आले असल्याचा आरोपही होत आहे.