बेळगाव शहराच्या महत्वाच्या रेल्वे स्थानक परिसरात एक व्यवस्थेचा अभाव जाणवत आहे. रेल्वे स्थानक आवारात एटीएम ची सोय कुठल्याच बँकेने केलेली नाही. एक असलेले एटीएम बंद पडले आहे आणि रात्री अपरात्री नागरिकांचे हाल होत आहेत. याचा विचार करून बँका व रेल्वे खात्याने पुढाकार घेऊन लवकरात लवकर एटीएम सुरू करण्याची गरज आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना पैसे काढायचे झाले तर खानापूर रोडवर जावे लागते. प्रवासासाठी जाताना लोक पैसे बाळगत नाहीत पण रेल्वेतून उतरल्यावर पैसे लागतात यासाठी या भागात एटीएम ही आवश्यक गरज आहे पण लक्ष दिले जात नाही. नागरिकांना सध्या या कारणाने बराच लांब प्रवास करून एटीएम शोधण्याची वेळ येत आहे.
बेळगावच्याच काही जागरूक नागरिकांना ही अडचण जाणावल्यानंतर त्यांनी बेळगाव live कडे ही समस्या व्यक्त केली आहे. बदलत्या काळात एटीएम ही एक अत्यावश्यक गरज बनत चाललेली असताना ही व्यवस्था बेळगावच्या रेल्वे स्थानकावर नसावी याचेच आश्चर्य आहे.
रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या भागातील नागरिक येतात. सामान्य प्रवासी आणि लष्करी जवान तसेच अधिकाऱ्यांची गर्दी जास्त असते, त्यांना येणारी अडचण लक्षात घेऊन एटीएम सुरू करावे ही मागणी आहे.सिटीझन कौन्सिल सारख्या सारख्या संघटनांनी या मागणीचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.