बेळगाव शहरातील तिसरा रेल्वे गेट ते पिरनवाडी या चौपदरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याला वनमंत्री सतीश जारकीहोळी यांचे नाव देण्याचा ठराव महानगरपालिकेने मंजूर केला आहे.
आता या ठरावाला कोणाचा आक्षेप असेल तर तो नोंदवावा असे आवाहन महानगरपालिकेकडून आलेले आहे.
सतीश जारकीहोळी यांचे नाव या रस्त्याला देण्यासाठी महानगरपालिकेत ठराव झाला या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे .नगरसेविका जयश्री माळगी यांनी हा ठराव मांडला होता. महापौर बसप्पा चिकलदिनी यांनी तो ठराव मंजूर करून घेतला आहे. नाव जाहीर केल्यानंतर कोणाचाही विरोध होऊ नये यासाठी आताच आक्षेप नोंदवून घेण्याचा विचार महानगरपालिकेने केला असून त्यासाठी आक्षेप नोंद करून घेतले जात आहेत.
हा मार्ग मंजूर होऊन त्याचे काम सुरू होण्याचे श्रेय जारकीहोळी यांना जाते त्यामुळे त्यांचेच नाव रस्त्याला देण्यात यावे अशी मागणी जयश्री माळगी यांनी केली होती ,त्या वेळी सभागृहात कोणत्या प्रकारचा विरोध झाला नव्हता त्यामुळे नागरिक यावर आक्षेप देतील याबद्दल शंका असून आक्षेप न आल्यास ठरावा प्रमाणे रस्त्याला नाव देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.