शंभर वर्षे पूर्ण झालेल्या काही शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शताब्दी पूर्ण झालेल्या शाळांना मदतीचा हात देण्यास सरकार पुढे सरसावले असून, शंभर वर्षे पूर्ण झालेल्या राज्यातील १०० शाळांना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. बेळगाव शहर आणि परिसरात शंभर वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या अनेक सरकारी प्राथमिक मराठी शाळा आहेत. परंतु, सरकारने विशेष अनुदान देताना मराठी शाळांबाबत भेदभाव केला असून, एकाही मराठी शाळेची नोंद घेतलेली नाही.
बेळगाव शहर आणि परिसरातील ५२ प्राथमिक मराठी शाळांनी शंभरी पूर्ण केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शहरात अनेक शाळा सुरू झाल्या. त्यापैकी अनेक शाळांनी शंभरी गाठली आहे तर काही शाळा शताब्दीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे राज्यातील शंभरी पूर्ण केलेल्या शाळांना विशेष अनुदान देताना प्राथमिक मराठी शाळांचा विचार करणेही गरजेचे होते. परंतु शिक्षण खात्याने पहिल्या टप्प्यात अनुदान देताना मराठी शाळांना डावलल्याचे दिसून येत आहे.
…या शाळांना अनुदान
१८९१ मध्ये खंजर गल्ली येथे सुरू झालेल्या उर्दू शाळेला तसेच १९०६ मध्ये खानापूर येथे सुरू झालेल्या कन्नड शाळेसह शहरातील चचडी (सौंदत्ती) येथील कन्नड शाळा, मुडलगी येथील कन्नड शाळा, कुचडी (रायबाग) येथील उर्दू शाळा या प्राथमिक शाळा तर शहापूर येथे १८७४ मध्ये सुरू झालेल्या सरस्वती हायस्कूलसह अम्मनगी येथील माध्यमिक शाळेची विशेष अनुदानासाठी निवड झाली आहे.
ब्रिटिशांनी १८२६ मध्ये हुबळी-धारवाड येथे पहिली मराठी शाळा सुरू केली. १८३० मध्ये शहरात पहिली मराठी शाळा सुरू झाली. १८५६ मध्ये फक्त मुलींकरिता पहिली मराठी शाळा सुरू झाली. याचा विचार करून प्राथमिक मराठी शाळांनाही अनुदान देणे आवश्यक होते. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना म. ए. समितीतर्फे जाब विचारला जाईल.असे माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केले.
शंभर वर्षे पूर्ण केलेल्या मराठी शाळांची संख्या
बेळगाव शहर : १७
बेळगाव ग्रामीण : २३
खानापूर तालुका : १२
बातमी सौजन्य:इ सकाळ बेळगाव