लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून इच्छुक मात्र आतापासून मतदारांना आमिषे दाखविण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आपले कार्ड आणि रंगाची पाकिटे देण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे.
बेळगाव आणि चिकोडी मतदार संघात दि 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे अनेकजण आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी दिल्ली वारी आणि बड्या नेत्यांच्या पायऱ्या झिजवत आहेत. त्यामुळेच आता इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे. मात्र काहीजण आपल्याला उमेदवारी मिळणार या हेतूने आतापासून नागरिकांना आपल्याकडे खेचून घेण्यावर भर देत आहेत.
बेळगाव उत्तर भागात होळीच्या निमित्ताने रंग वाटण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी आपल्यालाच उमेदवारी मिळणार याच हेतूने ही खिरापत वाटण्यात येत आहे, असे दिसून येत आहे. रंग देऊन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा हा प्रकार असल्याचे दिसून येत आहे
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे. अजून उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी इच्छुकांनी आपल्या प्रचारात उडी मारली असल्याचेच दिसून येत आहे. आता यापुढे मतदारांनी शहाणे होण्याची गरज निर्माण झाली आहे.