पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या चेकपोस्ट वर आज सकाळी एक किलो 400 ग्राम चांदी व रोख पाच लाख रुपये जप्त केल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शैलेशसिंह रजपूत हे आपल्या क्रेटा गाडी क्रमांक एमएच 09 ईयु 5281 मधुन कोल्हापूर हून निपाणी कडे जात होते. येथील टोलनाक्यावर गाडीची तपासणी केली असता गाडी मध्ये पाच लाख रुपये व 1 किलो 400 ग्राम चांदी असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी सदर रक्कम व चांदीची कागदपत्रे दाखविण्यासाठी वेळ देण्यात आला पण कागदपत्रे सादर केली नसल्याने रक्कम व चांदी जप्त करुन निपाणी ट्रेझरी अधिकारी यांच्या कडे देण्यात आली अशी माहिती निपाणी ग्रामिण पोलिस ठाण्याचे निरिक्षक बी. एस. तळवार यांनी दिली.
यावेळी अबकारी खात्याचे निरिक्षक अमित बेळोबी, निपाणी शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक एच. डी. मुल्ला, ग्राम विकास अधिकारी शिवानंद तेली, मुस्तफा मुल्ला, ए. सी. कांबळे, डी. बी. कुंभार यांच्या सह अन्य अधिकारी उपस्थित होते.