देशाचंच नव्हे तर जगाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले.
कर्नाटकात दोन टप्प्यात 17 एप्रिल आणि 23 एप्रिल रोजी मतदान होनार असून बेळगावात दुसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल ला मतदान होणार आहे.
17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. गेल्या 8 दिवसांपासून उत्कंठा लागलेली घटिका समिप आली असून निवडणुकांचा बिगुल वाजला. देशातील 543 लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी केली. त्यामुळे, दिल्लीत असणारे नेते आता गल्लीकडे वळणार आहेत. तर, आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी विद्यमान खासदार आणि उच्छुक उमेदवारांची कसरत पाहायला मिळणार आहे.