त्यांची मुख्य ओळख कँटीन चालक हीच आहे. पण भांड्यात चहा टाकताना, विविध पदार्थांना फोडणी देतांना त्यांच्यातील कलाकार बाहेर पडतो. पेन आणि पेन्सिलची रेखाचित्रे त्यांच्या हातून घडत राहतात. जीवन जगताना कँटीन चालक व्हावे लागले पण आतील कलाकार त्यांनी जिवंत ठेवला आहे. सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांतून मोकळे होऊन जीवन आणि कला ते एकत्र जगत आहेत.
बेळगाव live ला रविवारी टिळकवाडी येथे भेटले हे 57 वर्षीय कँटीन चालक आणि कलाकार.
कलामंदिर शेजारी त्यांचे छोटेसे कँटीन आहे. त्यांच्या हातच्या चहाला जसा गोडवा आहे तशीच त्यांच्या हातच्या कलेची सुंदरताही मनमोहक आहे. चटकन समोर उभ्या असलेल्या माणसाचे रेखाचित्र ते रेखाटतात.
किसन पाटील यांची कथा मोठी आहे. ते त्या काळात बीकॉम शिकलेले. चित्रकलेच्या सर्व परीक्षा त्यांनी दिल्या. व्यावसायिक चित्रकार होण्याचे त्यांचे स्वप्न होते पण ते साध्य होऊ शकले नाही.जे जे स्कुल ऑफ मध्ये जाऊन याच कलेतील पुढील शिक्षण त्यांना घेता आले नाही. घरची परिस्थिती हलाखीची होती. पण कला अंगात होती. आज ते आपली कला सांभाळून जगत आहेत.
प्रापंचिक जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत. आता फुरसतीचा वेळ मिळाला की ते रेखाचित्र काढत असतात. मुळचे हंदीगनूर येथील हे कुटुंब त्यानंतर कोरे गल्ली येथे राहत होते. सध्या ते आयोध्यानगर येथे राहतात.
या कलाकाराचे मार्गदर्शन नवीन पिढीला मिळावे आणि त्यांच्यातील एक संवेदनशील कलाकाराची ओळख व्हावी ही इच्छा माजी नगरसेवक किरण परब यांनी बेळगाव live कडे व्यक्त केली. जर त्यावेळी त्यांना जे जे स्कुल ला जाता आले असते तर ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार झाले असते, पण आता जर तर करून उपयोग होणार नसून त्यांच्या या कलेचा सन्मान नक्कीच व्हावा ही इच्छा किरण परब यांनी व्यक्त केली.