Thursday, January 9, 2025

/

‘होळीची पट्टी हो… होळीची पट्टी’

 belgaum

लहानग्यांची वार्षिक परीक्षा संपते न संपते तोच फाल्गुन महिन्यात होळी आल्याची चाहूल लागली की धपट्या,टूमक्या,छोटे तबले,रंग,वेगवेगळे मुखवटे विक्रीला ठेवतात तस अनेकजन गल्लोगल्ली विक्रीलाही येतात त्याच वेळी प्रत्येक गल्लीतील मूलं एकत्रित येत लाकूड फाटा गोळा करण्यास सुरुवात होते त्या क्षणा पासून सुरू होतो होळी रंग पंचमीचा उत्साह….एकटा कुराड,एकटा कोयता तर एकटा दोरी घेऊन बाकीचे मिळून छोटी झाड तोडून आणून गोळा करतात. काही जण तर ती चोरुन आणतात झाडे चोरून आणण्यात मजाच वेगळी असते.

लाकड गोळा झाली की वर्गणी गोळा करायची तर मजाच वेगळी असते.ज्याठिकाणी माणसांची,गाड्यांची वर्दळ जास्त असते मुलं ती जागा निवडतात आणी आडवा रस्ता पुरेल इतकी दोरी,एक ताट त्यात थोडा गुलाल घालून सर्वजन जमून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोरीची टोक धरुन येना जाणाऱ्यांना आडवत ‘होळीची पट्टी’ ‘होळीची पट्टी’ म्हणून ओरडतात.आडवलेल्याने पट्टी दिली तर ताटात घेतात आणी कपाळाला गुलाल लावतात.जर एखाद्याने नाही म्हटलं की सर्वजन जोरात बोंब मारतात.किंवा *आरकाटी तुरकाटी कोण होळीची पट्टी देन्नाय त्यांची गां…. लै खरकाटी* म्हणून पुन्हा बोंब मारायला सुरु करत ज्यांच्याकडे रनालगी किंवा लहान टूमक्या वाजवायला सुरुवात करताच आपोआपच गाडी आडवलेला मनूष्य पट्टी(देणगी) देतो.

आमच्या लहानपणी पाच,दहा पैसे गोळा होत होते पण दिवस बदलतील तसे पैसेही वाढत गेले.आता मुलं पाच,दहा रुपये घेतल्याशिवाय सोडत नाहीत.होळी दिवशीतर आपल्या गल्लीतील पट्टी काढतानां प्रत्येक घरातून लाकडं आणी शेतकरी घरं असतील तर शेनी घेऊन जातात.कारण होळी पौर्णिमेपासून पाच दिवस होळी पेटवत ठेवावी लागते.

Holi patti

होळी दिवशी सर्व लाकडं खड्डा काढून किंवा सिमेंट कचरा कुंडा आणून त्यात उभी रचली जातात.त्यात एक एरंड्याच झाडसुध्दा लावाव लागत.तशी परंपरा आहे. प्रत्येक गल्लीच स्थळ देवस्थान असतं त्याच्या आजूबाजूला होळी रचली जाते.स्थळदेवाच मंदिर धूवून रंग दिला जातो तसेच एक हिरवा बांबूचा खांब आणून त्याला बाशिंग बांधून टोकावर एक,दोन,पाच नारळ बांधले जातात.रात्र झाली कि प्रत्येक घरचे लोक होळीची,स्थळदेव,खांबाचीपूजा करत नारळ,पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.अनेक ठिकाणी खांब बैलगाडीतून वाजतगाजत आणला जातो.नैवेद्यातील एक दोन पोळ्या मुलं काढून घेतात.त्या गोळा करुन थोड्या होळीत अर्पण करतात व उरलेल्या रात्रभर जागरण करत खात असतात.पहाटे चार,साडेचारला होळी पेटवली जाते.तर अनेक ठिकाणी परंपरागत मुख्य होळी पेटवली जाते त्यातील विस्तव आणून गल्लीतील होळीत घालून नंतर पेटवली जाते.

Holi

सकाळ झाली की धुलीवंदन असते.त्याच दिवशी करी असते.अनेकजन घरी मांसाहाराचा बेत असतो.तर अनेक ठिकाणी रंगपंचमीही होतेच.बेळगाव पांगूळ गल्लीत तर तेथील लोक आपल्या घरापासून अश्वथामा मंदीरपर्यंत लोटांगण घालत जातात.त्यात इतर ठिकाणचेही भक्त असतातच.हे जे नवस करतात तेच करतात.पण तेथील उत्साह हा पहाण्यासारखा असतो.उपनगरात पांच दिवसाची रंगपंचमी असते.तर खासबाग सारख्या भागात होळी कामाण्णा देवाला मंडप करुन पांच दिवस वेगवेगळ्या रुपात अवतार दाखवले जातात.ते पहाण्यासाठी तर वडगाव,शहापूर,जुनेबेळगाव भागातील जनता होळीकामाण्णा देवाची रुप पहायला बरीच गर्दी असते.

असा हा होळीचा सण म्हणजे लहानग्यांची पर्वणीच असते.ते पाहिल कि आपले लहानपण आठवते आणी आपसूकच तोंडातून शब्द उमटतात *लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा*

माहिती सौजन्य: राजू मरवे वडगांव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.