11 रुद्र आणि 7 चिरंजीवी पैकी एक अवतार ठरलेला, गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा आणि अदृश्य आणि अमरत्व लाभल्याने महाभारतातील कुरुक्षेत्रातील लढाईचा आजवरचा एकमेव जिवंत साक्षीदार मानला जाणारा अश्वत्थामा. त्याचे दक्षिण भारतातील एकमेव मंदिर बेळगावात आहे. पांगुळ गल्लीतील या मंदिरात दरवर्षी होलिकोत्सव साजरा होतो. यंदाही हा उत्सव होतोय, आज बेळगाव शहरातील रंगपंचमीच्या निमित्ताने हजारो भाविक येथे लोटांगण घालणार आहेत.
अतिशय प्राचीन असे हे मंदिर आहे. 6 ते 7 वर्षांपूर्वीच या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. अश्वत्थामाचे हे जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे कोणतीही मागणी करून लोटांगण घातल्यास ती पूर्ण होते असे लोक मानतात.
होळी हा सण जुन्या रूढी परंपरा आणि विकृतीचे दहन करून नवी वाटचाल करण्याचा संदेश देतो. हा संदेश पाळत पांगुळ गल्लीत प्राचीन परंपरेला जपुन होळी साजरी होते.
कोल्हापूर, गोवा, बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील भाविक येथे दाखल होतात मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर मध्ये अश्वत्थामा मंदिर असल्याच्या नोंदी आढळतात. दरम्यान बेळगावच्या मंदिराची ख्यातीही संपूर्ण देशभरात आहे.
याठिकाणी स्त्री पुरुष आणि तरुण तरुणी उपस्थित राहून आपल्या मागणीप्रमाणे लोटांगण घालण्याची प्रथा पूर्ण करीत आले आहेत. यावर्षी चांगला रस्ता करण्यात आल्याने या ठिकाणी लोटांगण घालणाऱ्या भक्तांना सोयीचे ठरणार आहे.