पोलिसांच्या नाकर्तेपणाचा निषेध करत युवकानं पोलिस ठाण्यासमोरच विष प्राशन केल्याची घटना चंदगड मध्ये घडली असून या घटनेमीळ सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिस प्रशासनाचे या घटनेमुळे वाभाडे निघाले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, पार्ले ता. चंदगड येथील अमृत गावडे याला मागील वर्षी जबर मारहाण झाली होती. मात्र, पोलिसांनी ते प्रकरण गांभिर्याने न घेतल्यामुळे आंदोलन करून “त्या” आरोपीवर भादविस ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पण या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे , वाहन पोलिसांनी जप्त केली नव्हती शिवाय ती तक्रार मागे घ्यावी म्हणून पोलिसांनी रात्रीच्या वेळी आपल्या भावाचे अपहरण केल्याचे अमृतचे म्हणणे होते. तसे त्यांने निवेदनातही म्हटले आहे.
दरम्यानच्या काळात त्यांने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च न्यायालय आणि अनेक ठिकाणी पोलिस तपास करत नाहीत म्हणून आपणास २६ जानेवारी रोजी इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.
आज अचानक त्याने चंदगड पोलिस ठाण्यासमोर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांसह सर्वांचीच भंबेरी उडाली. त्याला तात्काळ बेळगाव येथील सरकारी इस्पितळात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक पवार, पो, उपनिरीक्षक राहुल पाटील, पो. कॉ. सागर चौगुले यांच्यावर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती.
या प्रकरणामुळे पोलिस उपअधिक्षक आर आर पाटील यांनी तात्काळ भेट दिली असून अमृत गावडेला सरकारी इस्पितळात पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आत्ता संबंधित पोलिसांच्यावर कारवाई होणार अशी चर्चा रंगली आहे.
न्यूज अपडेट :अनिल तळगूळकर चंदगड