शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारींवरून रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या गोकाक येथील सौभाग्यलक्ष्मी साखर कारखान्याची चौकशी होणार आहे. काँग्रेस नेते असले तरी पक्षाशी असलेले नाते तुटत चालल्याने आता रमेश जारकीहोळी यांचा हा कारखाना अडचणीत येणार आहे.
जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी एक चौकशी समिती तयार केली असून 2014-15 साली या कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या जात आहेत.
प्रांताधिकारी कविता योगपन्नावर व इतर अधिकारी या चौकशी समितीत आहेत. त्या पुढील तपास करणार आहेत. बिल थकीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केल्यावरून या चौकशीस सुरुवात करण्यात आली आहे.
कृषी व सहकार खात्यातील सदस्यांचाही या समितीत सहभाग आहे. जुनी कागदपत्रे तपासून लवकरात लवकर अहवाल सादर केला जाणार आहे.
हा अहवाल सरकारकडे पाठवून दिला जाईल, येणाऱ्या सूचनांनुसार पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.