Friday, January 24, 2025

/

अॅसीड पेप्टिक डिसाॅर्डर

 belgaum

शरीराच्या आवश्यकतेनुसार पचनासाठी जठरामध्ये नैसर्गिकरीत्या काही संप्रेरके स्त्रवत असतात. या संप्रेरकांमुळे पोटात अन्‍न गेल्यानंतर पचन सुरळीत आणि विना तक्रार होत असते. कामाच्या घाईगर्दीत भुकेकडे दुर्लक्ष करून बर्‍याचदा आपण अन्‍न प्राशन करण्याचे टाळतो आणि परिणामी या संप्रेरकांचे संतुलन बिघडते. यामुळेच पोटामध्ये आम्लाचे प्रमाण वाढत राहते..
गेल्या आठवड्यात पंचवीशीचा एक युवक चेहर्‍यावरील मुरुमांसाठी होमिओपॅथिक औषधाकरिता क्‍लिनिकमध्ये आला होता. त्याची प्राथमिक माहिती करून घेताना लक्षात आले की, हा तरुण नोकरीच्या निमित्ताने बेळगांवहून पुण्याला गेला होता. त्याच्या चेहर्‍यावर कपाळ आणि नाकाभोवती मोठ्या प्रमाणात फोड आले होते. फोड दुखतात व खाजतात. कालांतराने त्याचे डाग त्वचेवर तसेच राहतात असे तो सांगत होता, त्याची तक्रार ऐकून त्याच्या एकूण दिनचर्येविषयी विचारले. तरुण परगावी आल्याने मित्रांबरोबर राहतो. बाकी कोणताही पर्याय नसल्याने दररोज बाहेरचे जेवण घेतो. कामाच्या निमित्ताने दिवसभर एकाच जागी त्याला बसावे लागते. बहुतेक वेळा जेवणाची वेळ बदलत राहते. कामाचा ताण आणि सकाळी वेळेवर जाग येईल की नाही, या भीतीने त्याची रात्रीची झोपही शांत होत नाही.

त्याच्या व्यस्त कामाचा पाढा ऐकून होमिओपॅथीद्वारे त्याला योग्य औषध देण्याकरिता त्याच्या इतर तक्रारी जाणून घेणे आवश्यक होते. त्याला अधूनमधून छातीत जडपणा वाटतो. काहीवेळा पोटाच्या वरच्या बाजूस जळजळ होते. अनेकदा मळमळ होऊन भूकच लागत नाही. अशावेळी योग्य तो आहार न घेता, सटरफटर काही तरी खाल्‍ले जाते. शरीर थकून गेल्यासारखे वाटत राहते. कामाच्या ताणामुळे चिडचिड वाढते, असेही त्याने सांगितले.

दररोजच्या अनियमितपणाने त्याच्या शरीरातील उष्णता वाढल्यामुळे त्याचे पित्त वाढत असते, ही गोष्ट त्वरित लक्षात आली. पित्ताच्या वाढत्या परिणामामुळे त्याच्या चेहर्‍यावर मुरुमे येऊ लागली आहेत हेही जाणवले. अर्थात त्या तरुणाच्या तक्रारीचे निदान हे आम्लपित्त आहे हे वैद्यकीय नजरेतून सुटले नाही. आजच्या तरुण पिढीला प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा घेण्यात रस असतो म्हणून या लेखाद्वारे पित्ताविषयी बरेच काही सांगणार आहे.

शरीराच्या आवश्यकतेनुसार पचनासाठी जठरामध्ये नैसर्गिकरीत्या काही संप्रेरके स्त्रवत असतात. या संप्रेरकांमुळे पोटात अन्‍न गेल्यानंतर पचन सुरळीत आणि विना तक्रार होत असते. कामाच्या घाईगर्दीत भुकेकडे दुर्लक्ष करून बर्‍याचदा आपण अन्‍न प्राशन करण्याचे टाळतो आणि परिणामी या संप्रेरकांचे संतुलन बिघडते. यामुळेच पोटामध्ये आम्लाचे प्रमाण वाढत राहते. कालांतराने अति प्रमाणातील आम्ल जठर आणि अन्‍ननलिकेदरम्यान असणार्‍या झडपावर परिणाम होण्यास सुरुवात होते नि खाल्‍लेले अन्‍न वरवर येण्याची तक्रार उद्भवते. काहीवेळा जठरामध्ये व्रण अर्थात अल्सरही तयार होतात.

तरुण पिढी कामाच्या भाऊगर्दीत वेळेवर अन्‍न घेत नाही किंवा घेतलेच तर अयोग्य निवडीमुळे आहारात असमतोलपणा असतो हे वर नमूद केले आहेच. अर्थात हे केवळ तरुण पिढीचे दुखणे आहे असे नव्हे तर आजकाल प्रौढांचीही अशीच तक्रार असते. शिळे अन्‍न, थोडेच शिल्‍लक आहे म्हणून संपवण्यासाठी गरजेपेक्षा अति प्रमाणात घेतला जाणारा आहार, एकट्यासाठी अन्‍न गरम न करता गार अन्‍नाचे सेवन, कामाच्या व्यापात अन्‍नाऐवजी चहावर भर या आणि अशा प्रकारच्या महिलांमधील आढळणार्‍या सवयीमुळे खरे म्हणजे आम्लपित्ताची तक्रार सुरू होते. अति प्रमाणात मांसाहार, धूम्रपान, मद्यपान या आणि तत्सम चुकीच्या सवयीदेखील आम्लपित्ताला कारणीभूत ठरतात.

वरील सर्व कारणांची मिमांसा केल्यास असे ध्यानात येते की, आजच्या स्पर्धेच्या युगातील जीवनशैली अंगवळणी पडताना शरीराची मात्र हेळसांड होत राहते. त्याचाच परिणाम म्हणून पोटाच्या तक्रारी उद्भवू लागतात. मात्र, या परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी काही उपाय योजना केल्यास आपल्याला स्वास्थ्य टिकवून ठेवता येते.

पहिली गोष्ट म्हणजे आहार आणि विहाराची काळजी घेतलीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य होमिओपॅथिक औषधोपचार घेतल्यास या प्रकारच्या तक्रारींना निश्‍चितपणे दूर ठेवता येते हे लक्षात घेतले पाहिजे. येथे मुद्दाम नमूद करावयाचे आहे ते म्हणजे होमिओपॅथी शास्त्रामध्ये रुग्णाच्या शारीरिक तथा मानसिकतेचा सखोल अभ्यास करून औषधे दिली जात असल्यामुळे कोणत्याही आजारावर योग्य तो खात्रीशीर परिणाम दिसून येतो.

सततचे बैठे काम, अनियमित जेवणाच्या वेळा, अति मसालेदार आहार, अतिजागरण यामुळे पचनाच्या तक्रारी उद्भवणार्‍या रुग्णांसाठी नक्स व्होमिका हे औषध देता येते. पचनाच्या तक्रारी सुरू होऊन पोटात एकाच जागी दुखणे, अन्‍न वरवर येऊन पित्ताची वांती होणे, असे असले तरीही काही तरी खाल्ल्याने बरे वाटणार्‍या व्यक्‍तींना काली बीच औषधाने फायदा होतो. ज्या व्यक्‍तींना आंबट कडवट गुळण्या येत राहण्याचा त्रास असतो तसेच पोटात गुब्बारा धरल्यासारखा वाटतो, अशा व्यक्‍तींसाठी नेट फॉस या औषधची मात्रा लागू पडते. पित्तामधील डोकेदुखी, उलटी मळमळ, पोट फुगल्यासारखे वाटणे अशा तक्रारीकरिता रोबिनिया हे औषध काम करते. ही व अशी अनेक औषधे होमिओपॅथी शास्त्रामध्ये आहेत, जी व्यक्‍तीसापेक्षतेनुसार दिल्यास कमीत कमी वेळात त्रास आटोक्यात आणून पूर्णपणे बरा करता येतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.