समितीच्या चळवळीतून तो राजकारणात आला, नगरसेवक आणि महापौर ही महत्त्वाची पदे मिळाल्यानंतर त्याने काँग्रेसची वाट धरली, काँग्रेस पक्षातून दोन वेळा आमदार झाला आणि त्यानंतर वाट चुकल्यामुळे दोन वेळा सपशेल पराभूत झाला. आता त्या व्यक्तीला खासदार बनण्याचे स्वप्न लागले असून पुन्हा काँग्रेस पक्षाकडे जाऊन तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क साधून आपले नाव सुचवा अशी विनंती करण्यास त्याने सुरुवात केली आहे .त्या व्यक्तीचे नाव आहे रमेश कुडची…..
बेळगाव शहराच्या इतिहासात महाराष्ट्र एकीकरण समिती सोडल्यानंतर राजकीय यश मिळवलेल्या काही मोजक्या व्यक्तींमध्ये रमेश कुडची यांचे नाव घेता येते, हिंदू आणि मुस्लीम समाजात असलेले संबंध स्वतःच्या कुरबर या जातीचा फायदा आणि काँग्रेसची मते या जोरावर रमेश कुडची दोनदा आमदार झाले. बेळगाव शहर मतदारसंघ असताना सलग दोनदा आमदारकी मिळवणे ही साधी गोष्ट नव्हती. तिसऱ्यांदा पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजप कडे जाण्याचा प्रयत्न केला. तेथे अपयश आल्याने एकावेळी जेडीएस आणि दुसऱ्यांदा काँग्रेस अशा पक्षातून आमदार होण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले होते. काँग्रेसमध्येच शांत राहिले असते तर तेव्हाच खासदार झाले असते अशी चर्चा होती मात्र राजकीय दृष्ट्या गणित चुकल्यामुळे मध्यंतरी भूमिगत झाले होते आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याची माहिती मिळत आहे .
काँग्रेस पक्षाने सर्वसमावेशक उमेदवार निवडून भाजपचा पाडाव करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत यासाठी मराठा उमेदवार द्यावा की लिंगायत याची चर्चा सुरू असताना हिंदू मुस्लिम मते घेणारा उमेदवार शोधण्याचे प्रयत्न सुरू असून रमेश कुडची यांचे काय होणार हे स्पष्ट नाही. आपल्या बाजूने रमेश कुडची यांनी हालचाली सुरू केल्या असून काँग्रेसमधील जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना फोन करून त्यांनी आपले नाव सुचवा आपण नक्की खासदार होऊ असे सांगण्यास सुरुवात केली आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि जारकोहोळी बंधूनी देखील त्यांना प्रयत्न करण्यासाठी हिरवा कंदील दिला असून त्यांनी जोरदार लॉबिंग करायला सुरुवात केली आहे.बेळगाव लोकसभा मतदारसंघात लिंगायत नंतर धनगर हा सर्वात मोठा समुदाय आहे आमदार विवेकराव पाटील यांच्या नंतर रमेश कुडची हे या समाजातील एक नाव आहे या शिवाय बेळगाव दक्षिण उत्तर ग्रामीण मतदार संघात हे नाव ओळखीचे आहे मराठी मतदारांवर प्रभाव टाकणारे आहे त्यामुळे देखील त्यांचा विचार काँग्रेस हाय कमांड करील का हा प्रश्न आहे.