स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच तरुणांमध्ये प्रशासकीय सेवांमधील करिअरचे आकर्षण राहिले आहे. अत्यंत स्पर्धात्मक म्हणून ओळखली जाणारी ही परीक्षा ‘अवघड’ म्हणून गणली जात असली तरी वास्तविक पाहता ती ‘व्यापक’ स्वरूपाची आहे. नेमकी माहिती,योग्य नियोजन, सातत्य यांच्या जोरावर आय.ए.एस. मधे यश मिळवणे सहज शक्य आहे,असे मत ‘द युनिक ॲकॅडमी,पुणे’ च्या बेळगाव शाखेचे प्रमुख राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
के.एल.एस. संचलित गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आय.क्यू.ए.सी. आणि ॲडव्हान्स लर्नर्स ग्रुप तर्फे आयोजित ‘आय.ए.एस. परीक्षांची तयारी’ या कार्यशाळेत ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की ‘क्षमता असूनही ग्रामीण, निमशहरी तथा प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी योग्य माहिती अभावी या परीक्षेपासून दूर राहतात. अनेक गैरसमज जसे ‘ही अत्यंत अवघड परीक्षा आहे, यासाठी अस्खलित इंग्रजी येणे आवश्यक आहे, शाळा-कॉलेजपासूनच तुम्ही हुशार व टॉपर असायला हवेत इत्यादी’ विद्यार्थ्यांमध्ये अनावश्यक भीती उत्पन्न करतात.
परीक्षा पास होण्यासाठी हुशार असण्यापेक्षा सातत्यपूर्ण व प्रामाणिक कष्ट करण्याची गरज असते. परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रमाची व्याप्ती व प्रश्नपत्रिकांचा कल या गोष्टी लक्षात घेतल्यास अभ्यासास योग्य दिशा मिळू शकते. व म्हणूनच ग्रामीण तथा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्फत प्राप्त होणाऱ्या प्रशासकीय सेवांकडे करिअर म्हणून गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विरापुर यांनी स्वागतपर भाषण केले.
आय.क्यू.एस.सी. च्या प्रमुख प्राध्यापक सरिता पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राध्यापक ग्यामनायक यांनी आभार मानले कार्यक्रम स्थळी अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर कामकर तथा द युनिक ॲकॅडमी बेळगाव चे प्रोजेक्ट मॅनेजर जितेश मेणसे उपस्थित होते.