Thursday, January 2, 2025

/

गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीराम पचिंद्रे यांची निवड

 belgaum

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन व संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या मसूर (जि. सातारा) येथील गुंफण अकादमीच्या पुढाकाराने सीमाभागातील कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे १० पेâब्रुवारी रोजी होत असलेल्या १६ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांची निवड करण्यात आल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ असणाऱ्या गुंफण अकादमी व जिव्हाळा साहित्य अकादमी (कावळेवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने सीमाभागात मराठी भाषा, मराठी साहित्याला बळ देण्याच्या हेतुने हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गुंफण अकादमीच्या वतीने यापूर्वी सीमाभागातील मणतुर्गे व जांबोटी (ता. खानापूर, जि. बेळगाव) तसेच सातारा, मसूर, पणजी (गोवा)या ठिकाणी साहित्य संमेलनांचे आयोजन केले होते.

कावळेवाडी येथे होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या श्रीराम पचिंद्रे यांनी यापूर्वी विविध नामांकित दैनिकांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले असून सध्या ते दैनिक पुढारीमध्ये कार्यकारी संपादकपदी कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य आहेत. कोल्हापूर येथील अभिव्यक्ती साहित्य चळवळ, पणजी गोवा येथील गोमंतक साहित्य प्रबोधिनी या संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत.

त्यांनी विविध परिषदांमध्ये सहभाग घेतला असून विविध अभ्यास दौऱ्यातही त्यांचा सहभाग होता.
पचिंद्रे यांचा फुलोरा (कविता संग्रह), पत्रे सुरेश भटांची (संपादित), सूर्यपंख (गझल संग्रह), मुलाखत आणि शब्दांकन, नक्षत्रांच्या ओळी (संपादित), भष्टाचाराच्या कथा, लक्ष्यवेध, शाहू ही राजर्षि शाहू महाराजांच्या जीवनावरील कादंबरी, आभाळाचे पंख निळे (कविता संग्रह), नेताजी सुभाष : राजकीय जीवनगाथा (अनुवादित), रंग मैफलीचा, वाट इतकी सरळ, अवीट गाणी ही पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या शाहू महाराजांच्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांनी केला आहे. पचिंद्रे यांना अनेक सन्मान, पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शनच्या कार्यक्रमातही विशेष सहभाग घेतला आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.