सध्या मकर संक्रांतीचा सण आहे सगळीकडे तीळ-गुळ, तिळाचे लाडू आणि इतर पदार्थ विकणारे विक्रेते उपलब्ध झालेत.
अश्यातच एक विक्रेता आहे साहिल काजूकर .एका दुर्घटनेत त्याचा हात गमावला गेला, सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई त्याला मिळाली नाही. तरीही आलेल्या परिस्थितीवर मात करत तिळगुळ विकण्याचे काम साहिल करत आहे. आपल्या दुःखातही गोडवा पसरवण्याचे काम करणाऱ्या साहिल बद्दल सध्या सोशल मीडियात विशेष चर्चा होत आहे.
2013 साली सदाशिवनगर येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना विजेचा धक्का बसून चार जणांचा मृत्यू झाला होता. तर बाकीचे जखमी झाले होते. काहींना आयुष्यभराचे अपंगत्व आले. या दुर्घटनेत साहिल काजूकरने आपला उजवा हात गमावला. त्यावेळी तो वयाने लहान होता.
सरकारकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न झाले मात्र कुणालाच मदत झाली नाही. परिस्थिती बिकट आहे यामुळे त्याला दररोज नवीन कष्टाला सामोर जावं लागतं. आपल्या अपंगत्वाला कवटाळून न बसता तो कुटुंबाची गुजराण करण्यासाठी कामे करत राहतो. सध्या मकर संक्रांति असल्याने तिळगुळ विकून तो आपल्या कुटुंबासाठी पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत आहे.
सामाजिक संघटना आणि संस्थांनी पुढाकार घेऊन साहिलला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.