गोगटे सर्कल येथे बांधण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची पूर्तता झाली असून येत्या २५ डिसेंबर रोजी उदघाटन होऊन ते नागरी वाहतुकीसाठी खुले होणार आहे. नागरिकांना वर्षाच्या अखेरीस एक चांगली भेट मिळणार आहे.
यादिवशी ख्रिसमस असून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सुद्धा आहे. या दिवशी १२६ ए क्रॉसिंग वरील हे चारपदरी ब्रिज लोकांना मिळणार आहे.
या ब्रिजच्या कामाला अखेर ३ ऑक्टोबर २०१७ रोजी मुहूर्त मिळाला होता.खासदार सुरेश अंगडी यांनी भूमी पूजन करून या ब्रिजच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. एप्रिल २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना होती पण त्यापूर्वी चार महिने आधीच हे ब्रिज पूर्ण करण्यात आले आहे.
काम सुरू करण्यास १४ ऑक्टोबर ही तारीख उजाडली होती. तत्पूर्वी तीन दिवस प्रायोगिक तत्वावर बॅरिकेड्स बसवून ट्रॅफिकचा अहवाल पोलिसांनी तयार केला होता त्यानंतर जनतेतून आधी ओल्ड पी बी रोड उड्डाण पूल सुरू करा मगच रेल्वे पुलाच काम करा अशी जनतेतून मागणी करण्यांत आली होती.
त्यामुळेच सहा महिने जनतेला पुन्हा ट्रॅफिक जॅम चा फटका सहन करावा लागला होता.
या ब्रिजच्या कामासाठी एकूण १४ कोटी ३६ लाख ४१ हजार इतका खर्च आला आहे. १८ महिन्यात ते पूर्ण झाले आहे. कृषी इन्फ्रा टेक या कंपनीने हे काम पूर्ण केले असून बेळगाव शहराच्या सौन्दर्यात भर पाडली आहे.