बेळगावात मराठी फलक का दिसत नाहीत असं मी विचारलं असता मराठी फलक लावले की पोलिसांची दडपशाही सुरू होते असं कळलं त्यामुळे मला कर्नाटक सरकारला विचारायचं आहे की “दीडशे वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांची इंग्लिश भाषा तुम्हाला चालते तर तुम्हाला मराठी भाषा का चालत नाही”असा थेट सवाल अमरावती अचलपूरचे आमदार बचू कडू यांनी कर्नाटक सरकारला केला आहे.
बेळगाव तालुक्यातील सांबरा येथील माय मराठी साहित्य संमेलनात सहभागी झाल्यावर ते बोलत होते.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा.हरी नरके होते.यावेळी व्यासपीठावर माजी महापौर शिवाजी सुंठकर,तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर,दिलीप चव्हाणआदी उपस्थित होते.भूसंपादनाच्या माध्यमातून मराठी शेतकऱ्यांवर अन्याय होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही माझ्या संघटनेचे नाव प्रहार आहे कर्नाटक सरकार वर प्रहार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की कोणत्या ना कोणत्या कारणाने मराठी माणसाच्या अस्मितेच अस्तित्व संपवण्याचा काम होत आहे ते चुकीचं असून मी जात भाषा भेदभाव करणारा माणूस नसून जर का मराठी भाषिक म्हणून अन्याय होत असतील ते ते चुकीचं आहे. आम्हाला एकदा आवाज द्या कर्नाटक सरकारच्या लाठ्या अन बंदुकी मोठ्या ठरतात की आम्ही मोठे ठरतो हे पाहू माझ्यावर 350 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत मरे पर्यंत 500 होऊन जातील दोन केस मध्ये आठ आठ महिन्याची सजा झाली आहे त्यासाठी वरच्या कोर्ट मध्ये अपील केलंय नाहीत तर तुरुंगात राहिलो असतो त्यामुळे सामान्य माणसासाठी आम्ही कायदा हातात घेऊ असे ते म्हणाले.
आजच्या युगात सचिन तेंडुलकर ची रन मोजणारी औलाद गावा गावात आहे.सचिन ने किती रन काढले याची काळजी घेतात पण माझे आई वडील माझ्यासाठी शेतात किती रन काढतात हे ना दिल्लीतले युवक मोजतात ना गल्लीतील मोजतात त्यामुळे आई वडिलांची मेहनत मोजणारे कार्यकर्ते गावा गावात तयार झाले पाहिजेत जो पर्यंत आई वडिलांचं मूल्य मोजत नाही तोवर हक्काच्या लढाईला धार येत नाही.
सेनेचे 66 आमदार आहेत बचू कडू एकटे काय करतील असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल बचू कडू एकटा जरी असला तरी महाराष्ट्राच्या सभागृहात नक्कीच आपली जबाबदारी पार पाडेल एकदा हवं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा आम्ही अपक्ष आहोत असेही त्यांनी सांगितलं.या भागातले बेळगावचे जरी पेशन्ट असले तरी महाराष्ट्राच्या सर्व सुविधा त्यांना देऊ रुग्णांना मदत करू असे ठोस आश्वासन देत त्यांनी स्वतः 100 वेळा रक्तदान केले सत्तर हजार रुग्णांना जीवनदान दिली असल्याची आठवण करून दिली. जरी कन्नड भाषिक आले तरी मदत करू संकुचित वृत्ती ठेवणारे लोक आम्ही नव्हेत असाही ते म्हणाले.
आम्ही मारणाऱ्याला बलवान मानत नाही तर जगावणाऱ्या ला बलवान मानतो.बेळगावातल्या मराठी माणसाचा सेवाभाव ,तुकाराम,तुमच्या कर्मातून सेवेतून कानडी सरकारला दिसला पाहिजे वेळ पडल्यास छत्रपतींची तलवार रणांगणात चमकली पाहिजे.तुम्ही एक पाऊल पुढे घेतला तर मी दोन पाऊल पुढे येऊन तुमच्या मदतीला आल्या शिवाय रहाणार नाही.