महानगरपालिकेच्या जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीतून अनेक मतदारांची नावे गायब झाल्याचे उजेडात येत आहे. मतदार यादीतील चुकांबद्दल आक्षेप नोंदवण्यास आज आणि उद्या असे दोनच दिवस असून जास्तीत जास्त नागरिकांनी आक्षेप नोंद करण्याची गरज आहे.
रिसालदार गल्ली येथील जुन्या महानगरपालिका कार्यालयातील इलेक्शन सेल मध्ये आज आणि उद्या जाऊन आपली नावे आहेत की नाहीत हे बघून त्याबद्दल आपला आक्षेप आणि हरकत नोंदवण्याची हीच वेळ आहे.
पारिजात कॉलनी व शहराच्या इतर भागातील प्रत्येक वॉर्डमध्ये मतदारांची नावे गायब करण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. नगरसेवक तसेच यापुढे नगरसेवक होण्याची इच्छा असलेल्यांनी या प्रकाराकडे यापूर्वी दुर्लक्ष केले असून याचा फायदा काही लोकप्रतिनिधींनी करून घेतला आहे. मराठी नगरसेवक तर याबाबतीत पूर्णपणे गाफील आहेत. वॉर्ड बदलले आता मी निवडून येत नाही मग दुसऱ्याचा फायदा का करू असे कमी दर्जाचे विचार या मागे असल्याची माहिती मिळत आहे.
मराठी मतदार संख्या कमी व्हावे असे षडयंत्र रचलेल्या माजी लोकप्रतिनिधींचा कट या प्रकाराने यशस्वी होऊ लागला आहे. समिती नेत्यांनीही घरापर्यंत संपर्क ठेवला नसल्याने निवडणुकी दिवशी आम्ही जागे होणार असे म्हणत ते झोपले असल्याचे दिसत आहे.
विद्यमान काही नगरसेवक या बाबतीत झोपलेले असताना आता पुढील काळात नगरसेवक होण्याचे स्वप्न बघणारे तसेच याआधी नगरसेवक पद भोगलेल्यांनी तरी जागरूकता दाखवण्याची गरज आहे.
दोन दिवस शिल्लक आहेत. नागरिकांनी आपला घटनेने दिलेला अधिकार अबाधित राखण्यासाठी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची पाहणी करून नसल्यास आक्षेप नोंदवावा.