कर्नाटक सरकार चा विरोध दर्शवण्यासाठी आयोजित सीमावासीयांचा भव्य महामेळावा सोमवारी वॅक्सिन डेपो मैदानावर होणार आहे. या मेळाव्याला महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे उपस्थित राहणार आहेत.त्यांची तोफ वॅक्सिंन डेपो मैदानावर धडाडणार आहे.
या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी दिलेली नसल्याने नाराजी असून मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार झाला आहे. विशेषतः तरुण वर्ग या मेळाव्यास अधिक संख्येने उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण सीमाभागातून या मेळाव्याला गर्दी होणार आहे. महाराष्ट्रातून इतर अनेक नेते या मेळाव्याला हजर राहणार असल्याने सीमावासीयांची शक्ती अधिक वाढली आहे.पोलीस परवानगी देऊ अगर ना देऊ आम्ही मराठी भाषिक वाकसिन डेपो मैदानावर उपस्थित राहून मराठी अस्मिता दाखवू असा निर्धार मराठी भाषिक व्यक्त करत आहेत.
या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सोबत खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह शिवसेनेचे धैर्यशील माने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगावात विधिमंडळ अधिवेशन घेण्याचा सपाटा लावला.
दरवर्षी हिवाळी अधिवेशन बेळगावात घेण्याचा घाट घातला जातो. यंदाही सोमवारपासून (ता. १०) विधिमंडळाचे अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून महामेळावा आयोजित केला आहे. दरवर्षी परवानगीवरून जिल्हा प्रशासन म. ए. समिती नेत्यांना वेठीस धरते नेमकी तीच स्थीती यावेळी असून ऐन वेळी परवानगी मिळू शकते.
रविवारी सायंकाळी पासूनच वॅक्सिन डेपो वरील मैदाना शेजारील वन राईत पेंडाल घालण्यात येत आहे.