आपले काम बंद ठेऊन कोर्ट बॉयकॉट करून बेळगावच्या वकिलांनी आज आंदोलक शेतकऱ्यांना पाठींबा दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील वकिलांनी आज काम बंद ठेवले आहे.
उसाची बिले वेळेत आणि योग्य मिळत नाहीत यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.
आम्ही सुवर्ण विधानसौध कडे जाणार नाही यामुळे सरकारने आमचा प्रश्न सोडवूनच आमच्याकडे यावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली असून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले आहे.
या आंदोलनास बेळगाव बार असोसिएशन ने आपला पाठींबा दिला आहे. अध्यक्ष एस एस किवडसन्नावर यांनी दुपारी बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व वकिलांच्या वतीने या आंदोलनास आपला पाठींबा दिला आहे.
यामुळे शेतकऱ्यांना बळ मिळाले असून त्यांच्या लढ्यासाठी वकिलांची साथ मिळाली असल्याने आता सरकारला लक्ष देणे भागच पडणार आहे.