बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना, आरक्षण आणि निवडणुकीवर स्थगिती
माजी नगरसेवक धनराज गवळी यांच्या याचिकेवर सुनावणी
निवडणूक घेऊ नका अशी न्यायालयाची सक्त सूचना
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक कोणत्याही परिस्थितीत घेतली जाऊ नये. मनपाने आव्हान देऊन योग्य बाजू मांडावी तोपर्यंत ही प्रक्रिया स्थगित ठेवावी असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्यायमूर्ती आर देवदास यांनी आज दिला आहे.
बेळगावचे वकील आणि माजी नगरसेवक धनराज गवळी यांनी याबद्दल जनहित याचिका दाखल केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने बेळगाव महानगरपालिकेने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करू नये. आणि सरकारच्या वतीने आव्हान याचिका सादर करावी तोपर्यंत संपूर्ण प्रक्रिया स्थगित करावी असा निकाल दिला आहे.
बेळगाव महानगरपालिकेची वॉर्ड पुनर्रचना पूर्णपणे चुकीची आणि अन्यायकारी आहे तसेच नव्याने रचना केलेल्या वॉर्डांसाठीचे आरक्षणही चुकीचे आहे अशी बाजू मांडून धनराज गवळी यांनी ही याचिका सादर केली होती.
नगरसेवक भैरगौडा पाटील आणि इतर आठ जणांचा या याचिकाकर्त्यांमध्ये समावेश होता. यांच्यावतीने advocate सचिन मगदूम यांनी काम पाहिले असून सरकार पक्षातर्फे advocate जनरल व मनपातर्फे वकील जगदीश पाटील यांनी बाजू मांडली आहे.
याबद्दल बेळगाव live कडे धनराज गवळी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की अन्यायी वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाच्या विरोधात हा विजय आहे.मनपाचे आरक्षण नियमांना धरून नाही वॉर्ड रचनाही पूर्ण चुकीची आहे. आता सर्व अन्याय दूर होईपर्यंत निवडणूक होऊ शकणार नाही कारण न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे.