तालुका पंचायतिच्या स्थायी समित्यांची बैठक सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आली होती. सहा महिन्यापूर्वी घेतलेल्या बैठकीला मुहूर्त मिळाला खरा मात्र या बैठकीकडे समितीच्या सदस्यांनी कानाडोळा केला आहे. केवळ तीनच सदस्य उपस्थित असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीचे सोंग कश्यासाठी असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.
मागील ६ ते ८ महिन्यापासून तालुका पंचायतीच्या तिन्ही स्थायी समित्यांची बैठक घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे या बैठका कधी होणार ? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी मिळून याचा मुहूर्त शोधला खरा पण सदस्यांच्या हलगर्जीपणामुळे याचा फटका अधिकारी वर्गाला बसला आहे.
तालुका स्थायी समितीचे अध्यक्ष यल्लाप्पा कोळेकर, नीरा काकतकर, भीमा नाईक इतकेच सदस्य उपस्थित होते. त्यामुळे बैठक घेणार कशी असा प्रश्न निर्माण झाला. यामुळे अधिकारी वर्गाची माफी मागत अध्यक्ष यल्लप्पा कोळेकर यांनी ही बैठक पुढे ढकलली असल्याचे सांगितले. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अशा बैठका घेण्यापेक्षा त्या ना घेतलेल्या बऱ्या असेच विचार काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सामाजिक स्थायी समिती आणि अर्थ लेखा समितीचे ही सारेच अधिकारी गैरहजर राहिले. तसेच यावेळी नवीन स्थायी समिती मध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार होती मात्र सारेच सदस्य अनुपस्थित राहिल्याने या बौठकीचा बोजावाराच उडाल्याचे सांगण्यात आले.