कुद्रेमनी शेतवडीत पंधरा दिवसापूर्वी वावरणारा बिबट्या आज पुन्हा या ठिकाणी आढळून आला. काजूच्या झाडाखाली बिबट्या बसल्याचे लोकांनी पाहिल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने अनेकांनी त्याचे चित्रण मोबाईलवर सुरु केले आहे.
बेळगाव-चंदगड महामार्गाशेजारी एका झाडा खाली सकाळीच हा बिबट्या बसलेला दिसला. बिबट्या झाडाखाली बसलेला असल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. काही वेळानंतर बिबट्याने झाडाखालची जागा सोडून गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कळताच ग्रामपंचायत सदस्य नागेश राजगोळकर यांनी वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर बेळगाव तसेच चंदगडचे वनाधिकाऱ्यांचे पथक कुद्रेमानीकडे रवाना झाले आहे. बिबट्याचे लोकांना दर्शन पंधरा दिवसानंतर झाले आहे.
या बिबट्याला पकडण्यासाठी १५ दिवसांपूर्वी गावाजवळच्या शेतात सापळा लावण्यात आला होता. मात्र सापळ्यात सापडला नाही. आता मात्र महामार्गाशेजारी बिबट्याचा वावर आढळल्याने एक तर त्याला पकडणे किंवा जंगलात हुसकावून लावणे हे पर्याय वन खात्यासमोर आहे. त्यातही कुद्रेमनी हे गाव कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले असल्याने बेळगावचे वनखाते ही जबाबदारी चंदगडवर, तर चंदगडचे वनखाते ही जबाबदारी बेळगाववर ढकलत आहे. हद्द कोणाची या वादात न पडता दोन्ही राज्यातील वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकातून होत आहे.