त्वचेवर फोड किंवा पुटकुळी येऊन त्यात पू होतो. भोवतालची जागा लाल होते. हा फोड मोठा होऊन फुटतो आणि त्यातील पू व घाणीचा निचरा होतो. केस असलेल्या जागी असा फोड झाल्यास त्याला गळू केसतुड किंवा करट म्हणतात. फोड आलेली व आजुबाजूची जागा खूप दुसते. चेहरा, मान, कमरेकडचा भाग, मांड्या, अवघड जागी गळवे हमखास येतात.
कारणे आणि लक्षणे
स्टँफायलोकोकस या जंतूच्या संसर्गामुळे गळू होते. हे जंतू धर्मग्रंथी किंवा केसपुटकांतून प्रवेश मिळवतात. वेळच्यावेळी स्वच्छता ठेवली नाही तर त्वचेवरील तेल घाम व धूळ यामध्ये जीवाणूंची चांगली वाढ होते. रक्तातील विषारी घटकांमुळे गळवे होतात. चुकीचा आहार आणि अस्वच्छ राहणीमान या सर्वांचे मूळ आहेच. जेव्हा एखादी व्यक्ती अशक्त होते, तसेच कोणत्याही कारणामुळे तब्येत ढासळली असेल तरहिी गळवे येतात. तामसी आहार, व्यायामचा अभाव, व्यसने, दगदगीची जीवनशैली अशा कारणांनी शरीरातील विषारी द्रव्यांचे प्रमाण वाढते व त्वचेद्वारे अशा घटकांचे उत्सर्जन करण्यामुळे गळवे येण्यास सुरुवात होते.
मधुमेही व्यक्तींमध्ये रक्तशर्करा प्रमाणाबाहेर वाढल्यास गळवांचा त्रास होतो. वसंतरावांच्याबाबतीत असचं घडलं. मोठ्या हुद्द्यांवरची नोकरी, सुखासीन जीवनशैली, व्यायाम अजिबात नाही आणि आठव्यातून दोन तीन वेळा पार्टीला जाणं, वजन बेसुमार वाढलेले. एकदा अचानक त्यांना पूर्ण शरीरावर बॉईल्स येऊ लागले. अँटीबायोटिक्स इंजेक्शन घेऊनसुद्धा हा प्रकार थांबेना, त्यातच त्यांना मधुमेह झाल्याचे निदर्शनास आले. इन्शुलीन घ्यावे लागले. परंतु बॉईल्स मात्र कमी नाहीत. वसंतराव पुरते हैराण झाले. त्यांच्या पत्नी नेहमी काही झाले तरी होमिओपॅथीक औषधचं घ्यायच्या. त्यांनी वसंतरावांना होमिओपॅथीचा मार्ग सांगितला आणि खरोखरच एकच औषध विशिष्ट मात्रेत दिल्यावर हा दोन महिन्याचा त्रास पूर्णत: थांबला. आता त्यांना मधुमेहासाठी देखील होमिओपॅथीकचा चालू आहे.
लक्षणे : सुरुवातीला त्वचेवर बारीक पुटकुळी येते. बी मोठी होऊन फोड येतो. पू भरतो नंतर फोड फुटून पू बाहेर पडतो. हे गळू खूप ठणकते. खाज सुटते, काही वेळा एकानंतर एक अशी गळवांची मालिकाच सुरु होते. केसतुडीसुद्धा याच पद्धतीने होते. ताप येतो, अंगात ठणका राहतो.
उपचार : होमिओपॅथीने हमखास बरा होणारा हा आजार आहे. त्वचाविकार हे मनाच्या विकारांचे प्रतिबिंब समजले जातात. मानसिक ताण, भीती, चिंता व्यक्त होत नसल्यास शरीर या व्याधी त्वचेद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. असे होमिओपॅथीमध्ये मानले जाते. अर्थात सर्वच त्वचाविकार असे असतीलच असे नाही. काही जनुकांतील बिघाडामुळेही होतात.
गळू होण्यावर बेलाडोना, सिलीसिया, मर्कसॉल, हिपारसल्फ अशी औषधं आवश्यकतेनुसार वापरली जातात. त्वचेवर लावण्यासाठी कॅलेंडुला, इकिनेशिया, क्रायसॉर्बियम अशी औषधं वापरली जातात. अर्थात त्वचारोगांवर असे वाचून उपचार केल्यास अर्धवटच आराम मिळू शकतो. त्याकरिता तज्ञांचा सल्ला घेणे जरुरीचे आहे.
निसर्गोपचार
कडूलिंब : कडूलिंबाची 15 ग्रॅम पाने 500 मि.लि. पाण्यात चांगली उकळावीत या पाण्याने करट धुवावीत किंवा कडुलिंबाच्या पानाचे पोटीस गळवावर बांधावे.
कारले : पू न झालेली गळवे कारल्याचा रस पोटात घेतल्याने बरी होतात. एक चमचा कारल्याचा रस व एक चमचा लिंबाचा रस अनोशापोटी रोज घ्यावा.
दुधावरची साय : अर्धा चमचा व्हिनेगार, चिमूटभर हळद, चमचाभर साय एकत्र करुन, घोटून गळवावर लावल्यास पू न होता गळवे बरी होतात.
हळद : हळदीची पूड गळवावर लावल्यास उपयोग होतो किंवा दोन तीन हळकुंडे भाजून त्यांची राख एक कप पाण्यात मिसळून गळवावर लावावी. गळू पिकून फुटते व ठणका थांबतो.
आहार : सात्विक आहार घ्यावा. दोन दिवस फक्त फळांचे रस घ्यावेत. नंतर भात व मुगाचे वरण असा आहार एक दिवस घ्यावा. मांसाहार टाळावा. भरपूर पाणी प्यावे. चहा, कॉफी, मैद्याचे पदार्थ, फास्टफूड टाळावे. लोणची सॉस, चायनीज खाऊ नये. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास उपचार करुन घ्यावे. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, कोशिंबीरी भरपूर खाव्यात.
इतर : मोकळ्या हवेत भरपूर फिरावे. ध्यान, प्राणायाम करावा. शक्य असल्यास सोना बाथ, स्टीम बाथ घ्यावा. उन्हाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ करावी. आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकावीत. वाळ्याच्या चोथ्याने अंग घासून स्वच्छ करावे. घाम खूप येत असल्यास बुरशीरोधक पावडर स्नानानंतर अंगाला लावावी.