बेळगावात ऊस आंदोलन पेटले असताना साखर कारखानदार मात्र शेतकऱ्यांची लूट करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बेळगाव हे साखर उत्पादनाचे मुख्य स्रोत आहे. आंदोलन पेटले असताना बेळगाव परिसरात असलेल्या कारखानदारांनी आपल्या कारखान्यात काटामारीचे प्रकार सुरू केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात एकूण २२ साखर कारखाने आहेत. तर बेळगाव नजीक असलेल्या परिसरात महाराष्ट्र हद्दीत काही साखर कारखाने आहेत. यामधील काही साखर कारखाना चालकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करत ५० टनामागे ३ ते ४ टन काटा मारत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पुरती फसवणूक करण्यात येत आहे.
काही साखर कारखाने कारखान्याचाच ट्रॅकटर देत आहेत. जर शेतकरी हा ट्रॅकटर घेऊन इतरत्र वजन करण्यास गेले असता तुमचा ऊस आपल्या कारखान्यात नको म्हणून त्याला धमकी दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गोची होत आहे. २५ टन मध्ये २ टन काटामारी करण्यात येत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवालही उपस्थित केला जात आहे.
एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे संबंधितांनि अशा कारखान्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बेळगावपासून जवळच आणि महाराष्ट्र हद्दीत असलेल्या एका कारखान्यात असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अशा गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.