माळमारुती पोलीस स्थानक हद्दीत काल दुपारनंतर दिवसाढवळ्या तीन घरे फोडण्यात आली. हे पोलीस खात्याच्या क्षमतेवर आव्हान असून या चोरांचा लवकर बंदोबस्त होण्याची गरज आहे. या भागात निर्माण झालेले भीतीचे वातावरण पोलिसांनी दूर केले पाहिजे.
माळमारुती एक्सटेन्शन विभाग मोठा आहे. श्रीनगर, महानतेश नगर, झोपडपट्टी व कणबर्गी पर्यंत भाग माळमारुती पोलीस स्थानक हद्दीत येतो. या भागात कायम चोऱ्या व घरफोड्या होत आहेत.
या भागात नोकरदार लोक फार आहेत. दिवसा घरे बंद ठेऊन नोकरी व उद्योगासाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे लोक सकाळी गेले की रात्रीच परत येत असतात. त्यांची घरे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असून ती जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करा अशी मागणी होत आहे.
नागरिकांनीही दिवसा आपल्या घरात सुरक्षा उपाय करण्याची गरज आहे. एवढ्या चोऱ्या होत असताना पोलीस काय करत आहेत? हे कळत नसून गस्त व इतर उपाय राबवा अशी मागणीही होत आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लवकर चोरांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यावे अशी मागणी होत आहे.