आपली संस्कृती,अभिमान आणि कला विदेशातही जपली जाते. भारतीय लोक विदेशात नोकरीच्या निमित्ताने जातात तेथेच राहतात मात्र आपली नाळ ज्या मातीत आहे ती नाळ विसरत नाहीत. अश्याच एक बेळगावच्या कुटुंबाने ऑस्ट्रेलिया येथे किल्ला बनवला आहे. हा किल्ला त्यांनी बेळगाव live ला पाठवला आहे. विशेष म्हणजे बेळगाव live तर्फे आयोजित किल्ला स्पर्धेत थेट ऑस्ट्रेलिया इथून स्पर्धक मिळाला आहे.
रोहित अंची असे त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव आहे. लहानपणी ते शहापूर मध्ये राहायचे. पुढे ते अंजनेयनगर येथे गेले. मागील सात वर्षांपासून ते ऑस्ट्रेलिया मधील मेलबोर्न येथे राहतात. टेल्सट्रा येथे ते काम करतात.
तेथे आपण दरवर्षी किल्ला करतो असे त्यांनी बेळगाव live ला सांगितले. आपल्या मुलांना आपली संस्कृती जाणवून देण्यासाठी आणि तिथल्या लोकांना भारतीय परंपरा सांगण्याचा आपला उद्देश आहे असेही त्यांनी सांगितले.
शिवाजी महाराज एक गर्व आणि अभिमानाचे प्रतीक आहेत. लहान असताना शहापुरच्या गल्लोगल्लीत आपण किल्ला पाहिला आहे. आपण पण त्यात भाग घेत होतो.
इथे किल्ला पाहून ऑस्ट्रेलियन मित्र व ऑफिसचे सहकारी खूप खुश होतात. दरवर्षी त्यांना ओढ लागलेली असते की मी कुठला किल्ला करणार? यात जे समाधान मिळते ते शब्दात सांगता येत नाही असे रोहित अंची यांनी सांगितले. त्यांचे मूळ आडनाव जाधव असून नवी गल्ली येथे त्यांचे नातेवाईक आहेत.