विधानसभा निवडणूक काही महिन्यांपूर्वी पार पडली आहे. रणधुमाळी शांत होणार असे असतानाच आता पालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यावेळी मीच निवडून येणार असे मिरवत काही इच्छुक नगरसेवकांनी आता पासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून घेण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या प्रभागात फेरफटका मारून अनेकांनी हायबाय करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सोबत आता काही कार्यकर्तेही दिसू लागले आहेत. त्यानंतर आतापासून साहेबांचा प्रचार सुरू केल्याची बाब सामोरी येत आहे. त्यामुळे यावेळी आमच्या साहेबांकडे लक्ष राहू द्या, अशा गोष्टी आता अनेकांच्या कानावर पडत आहेत. त्यामुळे यावेळी आमचाच गुलाल उडणार, अशी आशा साऱ्यांना लागून राहिली आहे.
काही इच्छुक नगरसेवक यांनी कामेही हाती घेतली आहेत. त्यामुळे मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी पासून रखडलेली कामे आता तातडीने पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. काहींनी तर आपल्या कार्यक्षेत्रातील गटारी आणि साफसफाई करण्यावर भर दिला आहे. काही काळापुरता का असेना पण स्वच्छ बेळगाव आणि सुंदर बेळगावचे स्वप्न साकार होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
लवकरच पालिकां निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुकानीही जोरदार तयारी सुरु केली आहे. पण यावर्षी जनता कोणाचे पारडे जड करणार हे महत्वाचे आहे. इच्छुकांची होणारी आतापासूनची धडपड जणू बेळगावचा कायापालट करण्याचेच त्यांनी ठरविल्याचे दिसून येत आहे. मात्र निवडून आल्यानंतर प्रत्यक्षात कामे होणार काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.