बेळगाव जिल्ह्याची भूमी ही देशभक्त जवानांची भूमी आहे. या जिल्ह्यातील अनेक तरुणांनी भारतीय लष्करात सहभागी होऊन देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आता चिकोडी तालुक्यातील जवान शहीद होऊन आपले देशप्रेम दाखवून गेला आहे.त्याच पार्थिव आज त्याच्या जन्मगावी येणार असून त्याच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना बुदिहाळ(ता. चिकोडी जि. बेळगाव) चे जवान भोजराज उर्फ प्रकाश पुंडलिक जाधव मातृभूमीचे रक्षण करताना झाले शहिद झाले आहेत.
यामुळे त्याच्या जन्मगावी शोककळा पसरली आहे. भोजराज यांना प्राणांची आहुती द्यावी लागल्याने देशासाठी त्यांच्या गावाने एक वीर अर्पण केला आहे. एकीकडे अभिमान आणि दुःख या परिस्थितीत हा भाग दुःखात बुडाला आहे. या जवानाच्या कुटुंबाचे सांत्वन केले जात आहे.
या भागातील नागरिक भावपुर्ण आदरांजली देण्यासाठी त्यांच्या घरी जमत असून शाहिद जवान अमर रहे, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जात आहेत.
आज पार्थिव दाखल झाल्यावर गावात अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.