मराठी माणसावर आगपाखड करणारे पोलीस प्रशासन आता राज्योत्सवात करण्यात आलेल्या डॉल्बीच्या दणदणाटवर कारवाई करणार की पाठीशी घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ मराठी पोटशूळ असल्याने मराठी माणसावर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या पोलीस प्रशासनाने आता त्या डॉल्बीवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
गणेशोत्सव असो व शिवजयंती या दिवशी मात्र पोलीस डॉल्बीवर कारवाई करण्यास सज्ज असतात. तेच कर्नाटक सरकारचे कोणतेही कार्यक्रम असल्यास मुभा देण्यावर भर दिला जातो, असा दुजाभाव कशासाठी? त्यामुळे येथील जनता संताप व्यक्त करत आहे.
हिंदू सण असून देखील १०० डेसीबलच्या आतील डॉल्बी हवा अशी अट घालण्यात आली आहे. मात्र राज्योत्सवात अशी अट घालण्यात आली नाही. कारण मराठी माणसांना डीवचण्यासाठी हा सारा खटाटोप असल्याचे दिसून येत आहे.
मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज करून हिडीस नृत्य करण्यावरच भर दिला गेला. यामध्ये अनेक जणांनी मारामारी केल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे हा राज्योत्सव होता की लावणीचा कार्यक्रम असेच दिसून येत होते. मात्र पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेवून त्यांना अभय दिल्याचेच दिसून आले आहे.