आज बेळगाव शहरातून काळ्या दिनाचा एकच झंझावात झाला. हजारोंच्या संख्येने युवक आणि महिलांनी सहभागी होऊन ही फेरी यशस्वी केली. उपमहापौर मधूश्री पुजारी यांचा सहभाग आणि शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सहभागाने ही फेरी उल्लेखनीय झाली आहे.
आज सकाळी ९ वाजता या फेरीस धर्मवीर संभाजी उध्यान येथून सुरुवात झाली. सुरुवातीला फेरीत फार कमी संख्या होती. पण जस जशी फेरी पुढे पुढे जाईल तसे सीमावासीय तरुण दाखल होत गेले त्यामुळे प्रचंड उपस्थिती झाली होती.
लोकशाही आणि न्यायाच्या मार्गाने ६२ वर्षे १ नोव्हेंबर ला मूक सायकल फेरी काढण्यात येते पण यंदा सकाळी पर्यंत या फेरीस परवानगी मिळालेली नव्हती. सकाळी सात वाजता परवानगी देण्यात आली आहे.यामुळे उपस्थिती कमी होईल अशी शंका होती पण तसे झाले नाही. हजारो तरुण यामध्ये सहभागी झाले होते.
मध्यवर्ती म ए समितीचे नेते परवानगी साठी पोलीस आयुक्त कार्यालयात रात्रभर बसून होते पण परवानगी मिळाली नव्हती.
काल परवानगी मागायला गेलेल्या नेत्यांना प्रत्येकी पाच लाखाचे हमीपत्र आणून द्या असे पोलीस दलाने सांगितले होते. या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्यात आली होती. यावर शुक्रवार दि २ ला पुढील सुनावणी होणार आहे. याचा फटका परवानगीवर बसण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यामुळेच रात्रभर परवानगी दिली गेली नव्हती पण रात्रभर प्रयत्न करून समिती नेत्यांनी ती मिळवली यानंतर फेरीत अडथळे निर्माण केले जातील अशीही शक्यता होती पण शांतपणे फेरी झाल्याने पोलिसांनीही सहकार्य केले.
स्वतः डीसीपी सीमा लाटकर , एसीपी एन व्ही बरमनी , शहापूर चे सिपीआय जावेद मुशापुरी यांनी बंदोबस्त करण्यात मोठी कामगिरी केली आहे.
लाठीमाराचे गालबोट
फेरी शेवटच्या टप्प्यात गोवा वेस येथे आली असताना काही कार्यकर्त्यांना गैरसमज झाल्याने त्यांनी फटाके आणि बॉम्ब फोडून पोलिसांवर फेकण्याचा प्रयत्न केला यामुळे त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पण या लाठीमाराचे गालबोट रॅलीस लागले.