तिलारी डॅम मध्ये बुडालेल्या त्या दोन युवकांचे मृतदेह अखेर सोमवारी सापडले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी शोधकार्य करून मृतदेह शोधण्यात यश आले असून ते पोस्ट मार्टम साठी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले आहेत.
मृतदेह शोधण्याचे काम काल दुसऱ्या दिवशीही चालूच राहिले पण यश आले नव्हते. बेळगाव पोलीस व चंदगड पोलीसांनी संयुक्तरित्या स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन मोहीम राबविली आहे. सोमवारीही सकाळपासूनच जोरदार शोध करण्यात आला आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक स्वतः तिलारीत रविवारी सकाळ पासून ठाण मांडून होते. बेळगाव जिल्ह्यातून पाच जण तिलारी येथे आले होते ते कोण होते हे समजून घेण्यासाठी पोलिसांना कालची दुपार झाली त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना देखील तिलारीत बोलवून घेऊन शोध जारी ठेवण्यात आला होता.
अमृत,प्रभाकर,रवी,सोहेल,शिवशंकर हे संकेश्वरचे पाच जण आले होते त्यापैकी सोहेल व शिवशंकर बुडाले आहेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.
हा अंदाज खरा ठरला असून सोहेल गदगी (वय १९ )रा.यरगट्टी संकेश्वर बेळगाव व शिवशंकर पाटील (वय १९) रा.करगुप्पी संकेश्वर बेळगाव यांचे मृतदेह सापडले आहेत.
रविवारी सायंकाळ पर्यंत मृतदेह मिळतील असा अंदाज चंदगड येथील स्थानिक लोकांनी व्यक्त केला होता पण यश न आल्याने बेळगाव हुन अग्निशामक दलाच्या पथकाला देखील शोध कार्यातील मदतीसाठी बोलवण्यात आले होते.चंदगड पोलीस,बेळगाव ग्रामीण पोलीस,स्थानिक कार्यकर्ते आणि बेळगाव अग्निशामक दलाने शोध कार्य सुरू केलं होतं. आज बोटींच्या साहाय्याने मदतकार्य झाले आहे.