बेळगाव शहर आणि परिसरात पण्णी व गांजा विकणाऱ्या ड्रग माफियांचे जाळे बेळगाव पोलिसांच्या हातात लागले आहे. अतिशय गुप्तपणे या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच हे रॅकेट गजाआड जाणार असल्याची माहिती बेळगाव live ला मिळाली आहे.
गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवर असलेले बेळगाव शहर सध्या अंमली पदार्थ विक्रीवरून परत एकदा गाजत आहे. छुप्या मार्गाने गांजा विकला जात असल्याची माहिती अनेक वेळा पोलिसांना मिळाली पण पूर्ण रॅकेट हातात येत नव्हते पण पोलीस दलाच्या अथक परिश्रमातून आता या रॅकेट पर्यंत पोचणे शक्य झाले आहे. अंमली पदार्थासह रंगेहाथ पकडून त्यांची पूर्ण चौकशी सुरू असून बेळगावमध्ये तस्करी करणारे ते कोण हे पोलीस दलाकडून लवकरच उघड केले जाणार आहे.
यापूर्वीही बेळगाव शहरात अश्या अनेक ड्रग माफियांवर कारवाई झाली आहे.
उपनगरी भागात केंद्रे निर्माण करून गांजा व इतर अंमली वस्तूंचा साठा करायचा आणि महाविद्यालयीन तरुण व इतरांना छुप्या मार्गाने विकायचे धंदे जोरात सुरू आहेत. हे धंदे अनेकांना देशोधडीला लावणारे ठरले आहेत.
बेळगाव पोलीस दलामध्ये आता पुन्हा कर्तव्यदक्ष अधिकारी आले आहेत. त्यांच्या निगरानीखाली तपास करण्यात येत आहे. नशा विकून अनेकांचे संसार उध्वस्त करून आपण करोडो रुपये कमवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व्हावी अशी मागणी नेहमीच होत होती त्यामुळे आता पोलिसांनी लवकरात लवकर या टोळीतील गुन्हेगारांना कारागृहात पाठवावे अशीच इच्छा नागरिकांतून मांडण्यात येत आहे.
नशेच्या जाळ्यात अडकत चाललेल्या तरुणांना नशामुक्त करण्यासाठीही यापुढे प्रयत्न करावे लागणार आहेत. नशेत अडकून आणि पैसे मिळाले नाहीत म्हणून चोरी सारख्या घटनांकडे वळणाऱ्या तरुणांना सुधारून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.