पीएलडी नंतर आता एपीएमसी अध्यक्ष पदाचे वारे वाहू लागले आहेत. आमदार सतीश जारकीहोळी यांनी अध्यक्ष हा मराठीच करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे अक्का समोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्या मराठी सदस्याच्या गळ्यात ही माळ पडणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पीएलडी बँकेच्या राजकारणानंतर आता एपीएमसी अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार सतीश जारकीहोळी यांच्यातील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे सतीश जारकीहोळी यांनी अध्यक्ष मराठीचाच करणारा असल्याचे जाहीर केल्यामुळे अक्काच्या मानसुभ्यावर गदा येण्याची शक्यता आहे.
बेळगाव live ला खास मुलाखतीत सतीश जारकीहोळी यांनी यापुढे खासदार हा काँग्रेसचाच होणार आणि तो मराठीच असणार असे जाहीर केले होते. त्यामुळे आता हाच अजेंडा एपीएमसी मधील निवडणुकीतही अवलंबिणार असल्याचे दिसून येत आहे.
एपीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून येत्या 17 रोजी होणार आहे. 15 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील 20 महिन्याचा कार्यकाळ संपला आहे. एपीएमसी च्या अध्यक्ष पदासाठी 17 जणांना मतदानाचा अधिकार आहे. मात्र यावेळी अध्यक्ष हा जारकीहोळी गटाचाच होणार अशी चिन्हे दिसून येत आहेत. पीएलडी नंतर आता यांच्यातही माघार नसल्याचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होत आहे. सतीश जारकीहोळी यांच्या भूमिकेशी अनेकजण सहमत आहेत. त्यामुळे यावेळी एपीएमसी मधील निवडणुकीत आक्काच्या प्रभावाला काही मासे गळी पडलेतरच या निवडणुकीत रंग चढणार आहे.
एकूणच लोकसभा निवडणूक आणि मराठी मतांवर डोळा ठेऊन का असेना पुन्हा एकदा ए पी एम सी त मराठा अध्यक्ष दिसणार आहे.