गांजा आणि नशेचे पदार्थ सेवन करणाऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील उद्याने सात च्या आत बंद असा आदेश पोलीस आयुक्तांनी काढून केवळ काही दिवस झाले असताना कॅम्प भागातील एका उद्यानात मात्र अनेक गैर प्रकार पहायला मिळत आहेत.
कॅम्प भागातील या उद्यानात होत असलेल्या गैर प्रकारामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुले उद्यानातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
कॅम्प येथील स्वामी बेकरीच्या बाजूला असणाऱ्या पोस्ट ऑफिस जवळील उद्यानाची सध्या दयनीय अवस्था झालीय आहे. अल्पवयीन मुले व तसेच हिडिस प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळी गांजा,अफू सह इतर अनेक अमली पदार्थ सेवन केले जात आहेत. हे उद्यान म्हणजे अवैध धंद्यांचा अड्डाच बनला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पोलीस स्थानकापासून काही अंतरावरच हे उद्यान आहे. येथे अनेक गैरप्रकार चालू असताना पोलिसांनी असे प्रकार करणाऱ्याच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने असे प्रकार वाढले आहेत.
काही सुशिक्षित मंडळी कॉलेज युवक युवतीही याला अपवाद नाहीत. कोणाचाही वाढदिवस असल्यास तो साजरा करायचा आणि कचरा तेथेच टाकायचा. रात्रीच्या वेळी मद्य पिऊन धिंगाणा घालणारेही कमी नाहीत. अनेक बाटल्याही त्या ठिकाणी पडल्या आहे. अस असताना काही मॉर्निग वाकर्स फिरण्यासाठी येत असतात, त्यांना या उद्यानाची अवस्था पाहून संताप व्यक्त होतो आहे. त्यामुळे या पुढे तरी असे प्रकार थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.