लाल लाल आकर्षक सफरचंद काश्मीर मध्ये पिकतात हे जगजाहीर आहे. पण आपले गरिबांचे महाबळेश्वर असलेले बेळगाव सफरचंद पिकवणारे काश्मीर बनू शकते आणि सफरचंद पिकवणाऱ्या शहरांच्या यादीत बेळगावचा समावेश होऊ शकतो. काय हे खरे आहे? हो नक्की खरे आहे. याबद्दल एक तरुण संशोधन करत आहे. त्याचे संशोधन योग्य ट्रॅक वर चालले आणि यशस्वी झाले तर आपल्या बागेत सफरचंदाचे झाड लावणे आणि सहज तोडून सफरचंद खाणे सोपे होऊ शकते.
अनिस किणीकर हा तरुण बेळगावचा आहे.आपले संशोधन यशस्वी झाले तर बेळगाव मध्ये व्यापाराची एक नवी संधी शेतकऱ्यांना मिळेल असे तो सांगतो. मागील अनेक वर्षांपासून झाडे आणि रोपटी या क्षेत्रात तो संशोधन करत आहे.
इस्राईल मध्ये याप्रकारे सफरचंद पिकवण्यात येत असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने शोध सुरू केला. गरम वातावरणातही सफरचंदाचे झाड लावून त्याला फळे लागू शकतात यावर त्याचाही विश्वास बसला नाही.
हिमाचल सरकार यावर संशोधन करत असल्याचे लक्षात आल्यानंतर अनिस ने ती रोपटी मिळवून झाडशाहपूर येथील आपल्या बहिणीच्या जागेत लावली असून त्याने अभ्यास सुरू केला आहे.