प्रत्येक विवाहित महिलेला आपल्या माहेरची वेगळीच ओढ असते अश्या विवाहित मुलींना हक्काचा गणपती देण्याचं काम माळी गल्लीतील सार्वजनिक गणेश मंडळाने केलं आहे.
गणपती उत्सवाच्या निमित्ताने गल्लीतील विवाह करून सासरी गेलेल्या प्रत्येक मुलींना बोलावून त्यांना माहेरची साडी आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्याच काम या मंडळाने केलं आहे.
शुक्रवारी रात्री माळी गल्लीत माहेरच्या मुलींचा सत्कार सोहळा रंगला होता.मराठा बँकेचे संचालक अशोक भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गल्लीतील 28 विवाहित मुलींचा सत्कार करण्यात आला.
आपल्या माहेरी झालेल्या आगळ्या वेगळ्या सत्काराने मुली भारावून गेल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर हास्य लपत नव्हते सत्कार प्रसंगी अनेक महिलांनी आनंद व्यक्त करत उखाणे म्हटले.माळी गल्लीतील गणेश मंडळाने लेक वाचवा, स्त्री भ्रूण हत्त्या रोखा या सामाजिक संदेशाच्या देखाव्यावर भर देत असताना आपल्या गल्लीतील सर्व लाडक्या विवाहित मुलींना माहेरचा हक्काचा गणपती देऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केलाय.
यावेळी मंडळाचे मेघन लंगरकांडे, गल्लीतील युवा कार्यकर्ते उपस्थित होते.पत्रकार रवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.