आजच्या काळात माध्यमे सत्य सांगणारी आणि पारदर्शक वागणारी हवी आहेत. बेळगाव live ने ते स्थान मिळवले असून हा बेळगावचा रोखठोक आवाज आहे, असे मत सिटिझन कौन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी मांडले.
बेळगाव live च्या वतीनं आयोजित सेल्फी विथ बाप्पा आणि विधायक गणेश मंडळ स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे पदावरून ते बोलत होते.
यावेळी बोलताना मी प्रकाश बेळगोजी यांना दहा वर्षांपासून ओळखतो. पूर्वी आयबीएन लोकमत आणि आता बेळगाव live च्या माध्यमातून त्यांची पत्रकारिता मला माहित आहे.
त्यांनी लोकोपयोगी आणि समाजाभिमुख पत्रकारिता केली आहे. कायम पारदर्शकता आणि सत्यता दिसून आली आहे. बेळगाव live ज्या पद्धतीने बेळगोजी एकाकीपणे चालवत आहेत आणि त्यांच्या कार्याचा झपाटा हे अलौकिक आहे.
बातमी शोधणे, तिची पडताळणी आणि शब्दबद्ध करणे हे अवघड काम अतिशय सहजरित्या करणे हे वैशिष्ट्य आहे. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवणे हे उल्लेखनीय आहे. आज अनेक बेळगावकर तुमच्यासाठी पत्रकाराची भूमिका बजावतात हे खरोखर उल्लेखनीय आहे.
आज रोखठोक आणि स्पष्ट पत्रकारितेची गरज असून बेळगाव live हा बेळगावकरांचा आवाज बनला आहे असे तेंडुलकर यांनी गौरवोद्गार काढले.
पहिल्याच वर्षी आयोजन केलेल्या सेल्फी विथ बाप्पा यात एक हजार हुन अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. तीन वर्षांच्या चिमुरड्या पासून सीनियर सीटीझन, महिला, वकील, डॉक्टर, विद्यार्थी ,गृहिणी युवक युवतींनी यात सहभाग नोंदवला. सामाजिक कार्यात अग्रेसर शहरातील गणेश मंडळांचा देखील गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इंफंट्रीचे ब्रेगेडियर गोविंद कलवाड, मध्यवर्ती गणेश महामंडळ पी आर ओ विकास कलघटगी,नरगुंदकर भावे चौक गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर हे उपस्थित होते.बुधवारी सायंकाळी शहरातील नरगुंदकर भावे चौक गणेश मंडळाच्या मंडपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश भक्तांनी बेळगाव live च्या वाचकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा वाढवली होती.
शहापूर सिंघम म्हणून ख्यात असलेले पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांचा आणि एशियन गेम्स मध्ये ब्रॉंझ मेडल मिळवलेली तूरमूरीची कन्या मलप्रभा जाधव यांच्या live च्या वतीनं सत्कार करण्यात आला.बेळगाव live च्या वर्धापन दिनी बेस्ट पोलीस म्हणून ऑनलाइन सर्व्हेत निवड झालेले जावेद त्यावेळी निवडणूक आचार संहितेमुळं कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून त्याचा बुधवारी सत्कार करण्यात आला.