रक्षाबंधन. बहीण आणि भावाचा लाडका दिवस. बहीण आणि भावाचे नाते किती विचित्र असते ना? या नात्यातील वेगवेगळ्या अनुभवांचा आविष्कार केलाय प्रसिद्ध शेफ प्राजक्ता पै शहापुरकर यांनी. रक्षाबंधनाला हे उत्कृष्ट लिखाण वाचा आणि तुमचेही काही अनुभव असतील तर आमच्याकडे नक्की पाठवा……
संपादक
बेळगाव live.
प्राजक्ता पै शहापुरकर…..
मी साडेतीन वर्षाची असताना भावाचा जन्म झाला , पहिल्यांदा आईला सोडून चक्क चार दिवस राहावं लागलं ते ह्या कारट्या मुळे. घरी येताच आमची जागा बदलली ,आईच्या बाजूला महाशय झोपू लागले आणि आम्ही खाली, असा राग आला होता त्याच्यावर ,कश्याला आणलय हे पार्सल घरी कोणास ठाऊक असं वाटलं .आई ची ती कूस सोडून खाली झोपताना जगात सगळ्यात मोठा अत्याचार माझ्यावरच होतोय अस जाणवलं ,आई सांगते एके रात्री हळूच उठून रागाने मी त्याच्या कडे एकटक बघत होते ,आई घाबरली मला जवळ घेऊन म्हणाली लहान भाऊ आहे तुझा तो जरा मोठा झाला कि झोपवू त्याला खाली मग तू ये माझ्या कुशीत हं ! आई बेड वर बसून जेवायची सगळं विचित्रच वाटत होत ,दिवसभर तिच्या हातात हे पार्सल .
मजा म्हणजे जरा जवळ जाऊन बघुया म्हंटल कि आजी लगेच ओरडायची जस काय मी आता त्याचा हात पाय मोडणारच, इतकं घट्ट बांधून ठेवायचे त्याला कि पूर्ण दिसत सुद्धा नव्हता, तो आला आणि मला माझा बाबा मिळाला हा कायम आईच्या कुशीत मग बाबा बसवायचा मला खांद्यावर. ही एक गोष्ट चांगली केली पट्याने दिसायला गोरापान गोलगोल गुप्पा, छोटे छोटे पाय ,छोटे छोटे हात, अंघोळ घालताना कळलं माझ्यापेक्षा वेगळा आहे हा प्राणी ,म्हणून याला मुलगा म्हणतात. गाल म्हणजे अशे मऊ मैद्याचे पिट लोम्बायचे नुसता ,अगदी युरोपियन दिसायचा । येणारे जाणारे त्याचं कौतुक करायचे खूप छान वाटायचं पण शेवटी म्हणायचेही किती बारीक आहे ना तेव्हा असा राग यायचा,हळू हळू दोघे मोठे झालो आमचे खेळ कधी एक नव्हतेच मला लहान असताना काही खाऊ आणला कि फ्रिज मध्ये ठेऊन वाचवून खायची सवय आणि हा गोलगप्पा वाटेतच फडशा पाडायचा आणि मग काय माझ्या चॉकलेट वर डोळा, मी दोन दिवसांनी फ्रिज उघडलं कि चॉकलेट गायब .झालं माझं रडणं सुरु आई म्हणायची तुला नवीन घेऊन देते हं अस सांगून गप करायची आणि मला घेऊन देताना या पट्याला आणखीन एक मिळायचं , मग माझा हिशोब सुरु .
अस भांडत रडत दोघे मोठं झालो. मला आठवतं लग्न ठरल्यावर सुध्दा आमच खूप मोठं भांडण मारामारी झाली बाबानी दोघांना चढवली आणि सांगितलं झालं आता हे शेवटचं ,आता तू तुझ्या घरी जाणार आणि तू एकटाच राहणार यापुढे. भांडणाच कारणच राहणार नाही , पायाखालची जमीन तेव्हा सरकली. अचानक भांडायच कारण मिळेनास झालं ,पण प्रेम व्यक्त करताच येत नव्हत, तो दिवस आला पायात जोडवी घालताना डोळ्यात टचकन पाणी आलं आता वेगळं होणार हे खूप जास्त टोचायला लागलं , आपण किती छान वेळ भांडणात घालवला हे जाणवायला लागलं .
हाच खोड्या काढणारा चोरून चॉकलेट खाणारा भाऊ बॉक्स भरून चॉकलेट घेऊन यायचा अठरा वर्ष झाली लग्नाला , अजूनही भेटला कि विचारतो खुशीत आहेस ना? कोणी त्रास देत नाही ना? भावजी प्रेम करतो ना? त्रास दिला तर सांग करतो बरोबर, घेऊन जातो तुला परत इतका आनंद होतो त्यावेळेस, आपल्या बरोबर आपली ताकत आहे कोणीही आपल्याला त्रास देऊ शकणार नाही याचा एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो, तसं आमच्या सासरचे सगळे खूप चांगले आहेत मोठा दिर मोठ्या भावासारखाच वागवतो आणि मोठी नणंद तर अगदी आईसारखीच त्यामुळे असो,
माझ्यासाठी लहान असताना रक्षा बंधन म्हणजे फक्त भावाकडून मस्त गिफ्ट मिळणार एवढेच महत्व आणि भावाला सर्वात मोठी राखी मिळणार इतकच महत्व होतं पण सध्याच्या दिवसात इतके विचार बद्दललेत कामाच्या ताणामुळे एकमेकांना रक्षा बंधनला भेटू सुद्धा शकत नाही ,पण त्याचं दुख नाही इतके समजूतदार झालोय दोघे, कि राखी बांधूनच रक्षाबंधन होत असा विचार सुद्धा येत नाही. मनात आणि नात्यात इतकं प्रेम वाढलय कि रक्षाबंधन म्हणजे तो ठरलेला दिवस न राहता आयुष्यभर एकमेकांची रक्षा करायची त्याला त्रास आला तर मी त्याच्यासमोर ढाल सारख थांबायचं आणि मला त्रास आला तर त्यानं हे आता आपसूकच होईल ,एका दोरयानेच ते बांधून दाखवायची गरजच उरली नाही. जन्मोजन्मी हाच भाऊ मिळो हीच प्रार्थना. तसा आमचा खूप मोठा परिवार खूप चुलत आणि मावस भाऊ बहीण सगळे मिळून रक्षा बंधन साजरी करायचो ,आता सारे दूर गेले काहीतर भारतात पण नाहीत ,मी खूप मिस करते ते दिवस .एवढया दिवसात खूप काही बर वाईट घडलं एक भाऊ व एक बहीण देवाघरी गेले त्यांची पण खूप आठवण येते आणि येत राहणार माणूस असे पर्यंत त्याची किंमत नसते तो दिसेनासा झाला कि खूप …..?
लग्नानंतर म्हणजेच आता या वर्षी देखील खूप सारे भाऊ आहेत हे कळलं मोठी फॅमिली असली कि असच होत या सर्व भावंडाना बहिणींना रक्षा बंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ।
पूर्वीच्या काळी एकदा लग्न झालं कि मुलीला माहेरी पाठवत नव्हते आणि माहेरचे लोक सुद्धा भेटायला जाऊ शकत नव्हते। म्हणून हे सर्व सणवार केले त्यानिमित्ताने वर्षांतून दोनदा म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज या दिवशी दोघांची भेट व्हायची आता सध्या ती परिस्तिथी नाही आपण वर्षभर मनात आलं कि भेटू शकतो, म्हणून सांगते भावाला रक्षाबंधन च्या दिवशी यायला मिळालं नाहीतर रागावू नका समजून घ्या त्याला हेच खर प्रेम आणि हेच खर बंधन.