बेळगाव जिल्हा काँग्रेस मधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर आणि सतीश व रमेश जारकीहोळी ब्रदर्स यांच्यातील वाद वाढला आहे. तो मिटवण्यासाठी राज्य काँग्रेसचे नेते के सी वेणूगोपाल यांनी उद्या बंगळूर येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न होणार आहे.
सतीश आणि रमेश जारकीहोळी या दोघा भावांनी एकमेकांशी हातमिळवणी केली आहे. यानंतर त्यांच्यातील सख्य लक्ष्मी अक्काच्या राजकीय वाटचालीवर परिणाम करत आहे. पीएलडी बँक निवडणूक राजकारण आणि त्यातून संघर्ष निर्माण झाल्याने दोन भाऊ आणि अक्का यांच्यात वाद वाढला आहे. यातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.
हा वाद काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीवर परिणाम करू शकतो म्हणून तो आत्ताच मिटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. रमेश आणि सतीश यांच्यात वाद सुरू असताना लक्ष्मी आक्का यांच्या बाजूने रमेश जारकीहोळी होते. पण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभेचे वारे वाहू लागले असून आता दोन्ही भाऊ एक झाले असल्याचे व लक्ष्मी यांच्यावर तुटून पडल्याचे दिसत आहे.
लोकसभेसाठी लक्ष्मी यांनी आपल्या भावाचे नाव पुढे केल्याने हा वाद वाढल्याचे काँग्रेस वर्तुळात बोलले जात आहे. रमेश जारकीहोळी यांना कुठल्याही परिस्थितीत आपले बंधू सतीश यांना बेळगावचे खासदार करायचे आहे. यावरून दिल्ली येथे वाद होऊन दोन्ही जारकीहोळीनी लक्ष्मी यांना अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केल्याचे वृत्तही समोर आले. यातून वाद पेटत गेलाय.
आता काँग्रेसने या तिघांनाही बैठकीला येण्याची सूचना केली आहे. खासदारकीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन एक होण्यापेक्षा अंतर्गत वाद बाहेर काढले जात असून आता काँग्रेसला हे आतून हादरे बसत आहेत.