पी एल डी बँक म्हणजे कोणती बँक याला मतदान कोण करतंय याची माहिती बऱ्याच जणांना नसणार मात्र गेल्या तीन दिवसांपासून याच बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्याचं राजकारण तापलेले आहे.या बँकेत एकूण 14 पैकी किमान सहा सदस्य मराठी भाषिक आणि समितीचे आहेत मात्र आपलं स्वतःच अस्तित्व जपायचं सोडून राष्ट्रीय पक्षांच्या नादी लागलेले आहेत.
पी एल डी बँक ही बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची बँक आहे त्याचे सर्व भागीदारक शेअर होल्डर शेतकरीच असतात ही बँक ज्याच्या ताब्यात असते त्याच तालुक्यातील राजकारणावर पकड असते म्हणून या बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत महत्व प्राप्त झाले आहे. एकूण 14 पैकी समितीचे असलेले महादेव पाटील उचगाव हे एन डी पाटील यांचे खंदे समर्थक, बाबुराव पिंगट यांची पत्नी देखील सदस्य आहे दोनदा समितीकडून आमदारकी चं तिकीट या पिंगट घराण्याने मिळवलं होत,परशराम पाटील यळेबैल समितीचे नेते एकेकाळचे बी आय पाटलांचे पाठीराखे, सूर्याजी पाटील कडोली हे समितिनिष्ठ पूर्वी सतीश जारकीहोळी आता समिती नेत्यांच्या आदेशा वरून आक्काकडे, तर मच्छे येथील शंकर खोबना नावगेकर अशी पी एल डी बँकेवर असणारी ही मराठी मंडळी आहेत.
या बँकेचे अध्यक्ष पद लक्ष्मी हेब्बाळकर यांना आपल्या कडे ठेवायचे आहे मात्र जारकीहोळी फॅमिलीचा विरोध म्हणून निवडणूक पुढे ढकलण्याचा दबाव सुरू आहे. इतके दिवस लक्ष्मी हेब्बाळकर यांना साथ देणारे रमेश जारकीहोळी सुद्धा याच प्रकरणात त्यांना विरोध करत आहेत.असे असताना समिती नेत्यांनी समितिनिष्ठ सदस्यांना लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या दावणीला नेऊन बांधले आहे असेच दिसून येत आहे.
पीएलडी तील मराठी सदस्यांनी कुठल्याही पक्षाशी हातमिळवणी न करता आपले अस्तित्व स्वतंत्र ठेवण्याची गरज आहे. समितीच्या हेकेखोर नेत्यांचे वागणे लक्ष्मी आक्का च्या बाबतीत संशयास्पद ठरत आहे याबद्दल तरुण वर्गात प्रचंड नाराजी आहे.पीएलडी बँकेवरील अस्तित्व राखणाऱ्या मराठी माणसांना ताब्यात घेऊन लक्ष्मीताईनी आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विरोधी ग्रुप ने मराठी माणूस करा असा होरा लावला आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या दावणीला मराठी माणसे कशी बांधली जात आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे. आजपर्यंतच्या इतिहासात या बँकेत मराठी माणसाने कधीच अशी लाचारी केली नव्हती. मग आत्ताच असे का चाललेय हा प्रश्न आहे. मराठी माणूस अध्यक्ष होऊ शकत असताना असे दावणीला का बांधले गेले मराठी सदस्य हा प्रश्न गंभीर आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत मराठी माणसे लक्ष्मी यांच्या दावणीला नेऊन बांधली गेली. त्याचा फटका यावेळच्या विधानसभा निवडणुकीत सोसावा लागला. पैसे आणण्याची, खाण्याची आणि वाटण्याची परंपरा सुरू झाली. आता हे पैसे खाणारे वाढत असून यापुढे मराठी अस्मिता गहाण ठेवली जात आहे यामुळे जनता नाराज आहे. प्रत्येक मराठी सदस्याला लाखोंचं आमिष दिलंय त्याला सदस्य बळी पडलेत असा थेट आरोप सतीश जारकिहोळी यांनी केलाय त्यामुळं त्या मराठी सदस्या बद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे.
एकेकाळी काही वर्षांपूर्वी ए पी एम सी,तालुका मार्केटिंग सोसायटी,पीएल डी बँक किंवा तालुका पंचायत या बेळगाव तालुक्यातील संघ संस्थावर मराठीचे वर्चस्व होत मात्र समिती नेत्यांचे राष्ट्रीय पक्षांशी लागेबांधे सुरू झाल्या पासून वर्चस्व गमावले आहे.मराठी नेत्यांनी पैश्याचा नाद सोडून स्वतंत्र अस्तित्व जपावे हेब्बाळकर किंवा सतीश जारकिहोळी यांच्या नादी न लागता आपलं अस्तित्व का जपू नये हाच सामान्य मराठी माणसाचा सवाल आहे.