बेळगाव आणि बेळगावकरांचे दुर्दैव काही पाठ सोडिना अशी स्थिती मागील पाच दहा वर्षांपासून कायम आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या व्यक्ती एकतर प्रभावी नाहीत किंव्हा त्यांचा प्रभाव पडत नाही अशी अवस्था बेळगाव शहराच्या दृष्टीने घातक ठरत आहे.
लोकसभा निवडणुकीचेच घ्या, मागील तीनवेळा निवडून आलेले खासदार आपला प्रभावच पाडू शकले नाहीत. पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा वाजपेयींची लाट आणि तिसऱ्यांदा मोदींची लाट यामुळे त्यांचा विजय झाला. पहिल्यांदा व दुसऱ्यांदा ते निवडून आले तेंव्हा केंद्रात काँग्रेस चे सरकार होते. त्यामुळे त्यांना कायच करता आले नाही आणि सध्या भाजप चे सरकार असूनही ते मोफत वाय फाय देण्यापलीकडे कायच करू शकलेले नाहीत, ते आणि त्यांचे सरकार असून देखील त्यांना साधी बेळगावची विमानसेवा वाचवता आली नाही हे विशेष. दुसरे खासदार राज्यसभेचे. ते बहुमताअभावी असहाय्य आहेत.
विधानसभेत बेळगावची स्थिती दयनीय आहे. मागच्या वेळी समितीचे दोन उमेदवार निवडून आले पण सरकार काँग्रेसचे असल्याने वैयक्तिक स्वतःचे पोट भरून घेण्यापलीकडे त्यांना कायकरता आले नाही.
मोदींची लाट असो किंव्हा इतर काही असो यावेळी बेळगाव उत्तर आणि दक्षिण मध्ये दोन भाजपचे आमदार निवडून आले पण सरकार काँग्रेस आणि जेडीएस प्रणित आल्याने त्यांचे कायच चालत नाही.
उत्तरचे आमदार ज्युनियर आणि दक्षिणचे आमदार त्यांचे सिनियर आहेत पण त्यांनाही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा स्वताच्या मना प्रमाणे करण्याची शक्ती नाही. तिकीट मिळवून घेण्यासाठी खर्च केलेली कोटींची रक्कम कशी बाहेर काढायची? हा प्रश्न त्यांना सतावत आहे, महत्वाचे म्हणजे ते निवडून आले म्हणून आनंद व्यक्त करायचा की आले नसते तर बरे झाले असते असे म्हणायचे अशी वेळ बेळगावकरांवर आलेय.
सध्या स्मार्ट सिटी योजनेचे बारा वाजलेत, आम्हाला कायच विचारत नाहीत असे दुःख त्यांना आहे. ते त्यांनी जाहीरपणे मांडले पण सरकार त्यांना विचारत नाही आणि सरकार परत पडले तर पुन्हा तिकीट मिळवून निवडून यायचे आव्हान आहेच. त्यांचे समर्थक काळजीत आहेत आणि विरोधकही त्यांच्या या परिस्थितीबद्दल आणि त्यामुळे झालेल्या बेळगावच्या परिस्थितीबद्दल काळजीत आहेत.
दुर्दैव बेळगावकरांचे आहे. मटक्याची थेअरी काढणाऱ्या व्यक्तींकडुन अंदाज काढुन घेऊन कुणाचे सरकार येईल त्याला मत घालण्याची आव्हाने त्यांना पेलावी लागतील. नाहीतर पैसे देऊन तिकीट मिळवून घेणाऱ्या व्यक्तींना आपले प्रतिनिधी ठरवणे किती महागात पडते हे पाहून शहाणे व्हावे लागेल. तसे झाले नाही तर पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार हे नक्की..
आपला,
एक जागरूक नागरिक